शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या खिशावर चोराचा डल्ला, ५० हजार व्यासपीठावरून केले लंपास
सांगली : शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या खिशातून ५० हजार रुपयांच्या नोटांचं बंडल चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क ओबीसी मेळाव्यादरम्यान भर व्यासपीठावर ही घटना घडली. ओबीसी नेते विजय वडेट्टीवा यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगलीमध्ये हा कार्यक्रम सुरु होता. स्टेजवर वडेट्टीवार यांचा सत्कार सुरु होता.या दरम्यान चोरट्याने शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते यांच्या खिशातील नोटा लांबवतानाची घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चोराचा शोध सुरु आहे. सांगली शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांच्या खिशातील ५० हजार रुपयांच्या नोटांचं बंडल चोरट्याने चोरलं. सांगलीच्या स्टेशन चौकात काँग्रेस नेते, मदत आणि पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या ओबीसी मेळाव्या दरम्यान ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. स्टेजवर जाऊन चोरट्याने शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या खिशातून नोटांचं बंडल लांबवण्याची हिंमत केली. व्यासपीठावर असलेल्या गर्दीचा फायदा घेत त्याने नोटा लांबवल्या.