मोठा निर्णय ! शाळेच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द, एप्रिल महिन्यातही वर्ग सुरु

मुंबई : कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले आहे. ते भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आता उन्हाळी सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून, एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी ही माहिती दिली.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. आता शाळा सुरू झाल्या असून अपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक देखील मागणी करत होते. त्यानुसार एप्रिल महिना आणि रविवारीही शाळा सुरु राहणार आहेत. विद्यार्थ्यांच शालेय नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाकडून मोठा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे यंदा मात्र विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत फक्त अभ्यासच करावा लागणार आहे.

ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादांमुळे गेल्यावर्षी अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली होती. कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे यावर्षीही शैक्षणिक वर्ष ऑनलाईन पध्दतीने सुरु झाले आहे. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत असल्यामुळे अनेक शिक्षक संघटना, मुख्याध्यापक यांनी शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला.

राज्यातील सर्व शाळा जानेवारीपासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर आता मुंबईतील शाळा  देखील 24 जानेवारीपासून सुरू झाल्या आहेत. कोविड एसओपीचे पालन करत शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारच्या निर्णयानंतर मुंबई महापालिकेने स्थानिक स्तरावर पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शाळा 24 जानेवारीपासून सुरू करण्यासंदर्भातला निर्णय जाहीर केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *