औरंगजेबाच्या कबरीवर डोके टेकवणाऱ्या ‘AIMIM’ शी युती कदापि शक्य नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
(AIMIM) एमआयएमने महाविकास आघाडी सोबत युती करण्याचा विषय काढला, पण हा भाजपचाच कट आहे. औरंगजेबाच्या कबरीवर डोके टेकवणाऱ्या ‘एमआयएम’शी युती कदापि शक्य नाही, असं मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान उद्यापासून सुरू होत असून, त्यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे खासदार व संपर्कप्रमुखांशी ऑनलाइन संवाद साधला.
या अभियानात शिवसेनेचे खासदार, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी गावपातळीवर जाऊन महाविकास आघाडी सरकार व शिवसेनेने केलेल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत. याबाबत पक्ष पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्वाच्या मुद्यावरून भाजपवर घणाघाती टीका केली.
“शिवसेनेला जनाबसेना म्हटलं जात आहे. आपण हिंदुत्व सोडलेलं नाही. आता डाव बघा …काही कारण नसताना एमआयएमने महाविकास आघाडीला आघाडीची ऑफर दिली आहे. काही संबंध आहे का ? हाच खऱा डाव आहे. एमआयएमने ऑफर द्यायची आणि मग नंतर भाजपाने यावरुन टीकेचा भडीमार सुरु करायचा.
औरंगजेबाच्या थडग्यावर डोकी टेकतात त्यांच्यासोबत मेलो तरी जाणार नाही इतकी कडवट निष्ठा असताना उगाच हा मुद्दा काढायचा आणि आम्ही हिंदुत्वापासून दूर चाललो आहोत हे दाखवायचं. आम्ही काय मूर्ख नाही. आम्ही भाजपासारखं सत्तेसाठी लाचार नाही. आम्ही एमआयएमसोबत जाणं शक्य नाही,” असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.