जेनेटिकली मॉडिफाईड डुकराचं हृदय बसवण्यात आलेल्या व्यक्तीचा मृत्यू
दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेत एक शस्त्रक्रिया पार पडली होती. ज्यात डेव्हिड बेनेट यांना हृदयविकाराचा त्रास होता.शस्त्रक्रियेद्वारे त्यांना जेनेटिकली मॉडिफाईड डुकराचं हृदय बसवण्यात आलं होतं.
पण काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावू लागल्याचं बाल्टिमोरमधल्या त्यांच्या डॉक्टर्सनी सांगितलं. बेनेट यांचं शस्त्रक्रियेच्या दोन महिन्यांनी ८ मार्चला निधन झालं.
या शस्त्रक्रियेतले धोके बेनेट यांना माहिती होते. आणि हे अंधारात तीर मारण्यासारखं असल्याचं त्यांनी शस्त्रक्रियेपूर्वी म्हटलं होतं.
१० जानेवारी २०२२ रोजी जगामध्ये प्रथमच अमेरिकेतील एका व्यक्तीच्या शरीरात अनुवांशिक बदल करण्यात आलेल्या डुकराचं हृदय ट्रान्सप्लान्ट (प्रत्यारोपित) करण्यात आलं होतं.
बाल्टिमोरमध्ये तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर तीन दिवसांनी ५७ वर्षीय डेव्हिड बेनेट यांची प्रकृती सुधारत असल्याचं त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं.
“हे ट्रान्सप्लान्ट माझ्यासाठी ‘करा किंवा मरा’ असं होतं. मला माहिती आहे की, हे अंधारात बाण मारण्यासारखं आहे, पण हीच माझी अखेरची संधी आहे,” असं बेनेट यांनी सर्जरीच्या आधी म्हटलं होतं.
बेनेट यांच्यावर ही शस्त्रक्रिया केली नसती तर ते वाचू शकले नसते. त्यामुळंच युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल सेंटरच्या डॉक्टरांना अमेरिकेच्या आरोग्य नियंत्रकानं ही शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली होती.
शस्त्रक्रियेने डुकराचं हृदयरोपण करण्यात आलेल्या जगातल्या पहिल्या व्यक्तीचा मृत्यू झालाय.