राजकारण

अमरावतीत गुन्हा दाखल झाल्याने रवी राणा संतापले ; तर मी विधानसभेतच फाशी घेईल

Share Now

आमदार रवी राणा यांच्या समर्थकांनी अमरावती मनपा आयुक्तांवर शाईफेक केल्यानंतर रवी राणा यांच्यावर ३०७ आणि ३५३ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे आज विधानसभेत पडसाद उमटले. आमदार रवी राणा यांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवरच आरोप केले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी फोन केल्यामुळेच माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी खोटं बोलत असेल तर माझ्याकडे पेन ड्राईव्ह असून त्यात सर्व पुरावे आहेत. मी घटनास्थळी नसताना आणि दिल्लीत असताना माझ्यावर गुन्हा दाखल करत असाल तर मी विधानसभेतच फाशी घेईल, असा संतप्त इशारा आमदार रवी राणा यांनी दिला. तर, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री किंवा आपण कुणालाही फोन केला नसल्याचं स्पष्ट करत राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं.

विधानसभेत रवी राणा यांनी त्यांच्यावरील गुन्ह्याची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अडवण्यात आलं. तेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ उभं राहून राणा यांची बाजू घेतली आणि राणा यांना बोलण्याची परवानगी देण्याची विनंती विधानसभा अध्यक्षांकडे केली. त्यानंतर रवी राणा यांनी संपूर्ण माहिती सभागृहात मांडली. आज मला आर आर पाटलांची आठवण येते. त्यांच्या सारखा गृहमंत्री या राज्याला पाहिजे. तुम्ही वाझे सारखे क्रिमिनल अधिकारी निर्माण कराल तर तुमची अवस्था अनिल देशमुखांसारखी होईल. या माझ्या भावना नाहीये, संपूर्ण समाजाच्या भावना आहेत. गुन्हे दाखल करण्यासाठी तुम्ही फोन करता हे महाराष्ट्राचे दुर्देव. माझ्याविरोधात रात्री साडे दहा वाजता हा गुन्हा दाखल केला. एवढं प्रेशर आहे. एवढं प्रेशर आहे की रवी राणा दिसला तर गोळी मारा असं सांगितल्या गेल्याचं एका पोलीस अधिकाऱ्याने मला सांगितलं. अशा प्रकारची परिस्थिती असेल आणि मी खोटं बोलत असेल तर पेनड्राईव्हमध्ये पुरावे आहेत. मी फाशी घेईल. मला फाशी द्या, असं रवी राणा म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *