‘या’ तारखेला होणार विधानसभा अध्यक्षाची निवडणूक ; महाविकास आघाडीचे नेते राज्यपालाच्या भेटीला
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावेळी झालेल्या गोंधळामुळे राज्यपाल महोदय अभिभाषण अर्धवट सोडून सभागृहातून निघून गेले . त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं. कालच्या गोंधळानंतर आज महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज राज्यपालांच्या भेटीला राजभवनावर गेलं. त्यावेळी विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा मुद्दा आणि विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवर चर्चा झाल्याची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलीय.
विधानभवनात काल झालेल्या गोंधळानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात मंत्री एकनाथ शिंदे, जयंत पाटील, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, अनिल परब, नाना पटोले, सतेज पाटील, हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवनावर पोहोचले. अर्धा तासापेक्षा अधिक वेळ ही बैठक चालली. विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलीय.
विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या विषयावर राज्यपालांशी चर्चा झाली. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी परवानगी मिळावी ही विनंती राज्यपालांकडे केल्याची माहिती शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. ९ मार्च रोजी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी परवानगी मागितली. ती तारीख सोयीची वाटते. राज्यपाल याबाबत कळवतील, असं शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
आज महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने माननीय राज्यपालांची राजभवन इथे भेट घेऊन त्यांना विधानसभा अध्यक्ष निवडीसंदर्भातील निवेदन सादर केले.#विधानसभाअध्यक्ष pic.twitter.com/AfrRjcE1RX
— NCP (@NCPspeaks) March 4, 2022