आतंकवादाच्या विरोधात शिवसेनेला भाजपचा पाठिंबा, नवाब मलिक यांची हकालपट्टी करा – आशिष शेलार
देव, देश, धर्म हे नुसतं बोलण्यासाठी नसावं . उद्धवजी हे कृतीतून दाखवण्याची वेळ आली आता आहे . महाराष्ट्राने आता खूप ऐकलं आहे. देव, देश धर्मासाठी दाऊद आणि त्याच्या हस्तकांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्या. शरद पवार यांच्या समोर झुकू नका. नवाब मलिक यांना बडतर्फ करा. त्यांची हकालपट्टी करा, असं सांगतानाच आघाडीतील तीन पक्षात आमची केवळ उद्धव ठाकरेंकडूनच अपेक्षा आहे. अन्य दोन पक्ष वाया गेलेले आहेत. त्यामुळे उद्धवजी दहशतावाद्यांच्या विरोधात तुम्ही भूमिका घ्याल असा आमचा समज आहे आणि विश्वास आहे. तुम्ही अशी भूमिका घेतल्यास त्याला भाजप कोणतेही आढेवेढे न घेता, अट न टाकता, कोणतेही राजकीय भांडवल न करता तुम्हाला शंभर टक्के समर्थन देऊ. या कारवाईविरोधात तुमच्यासोबत उभं राहू. उद्धव ठाकरेंनी अधिवेशनात निवेदन ठेवावं. राजकारण बाजुला ठेवून भाजप खुल्या दिलाने तुमचं स्वागत आणि समर्थन करेल, असं भाजप नेते आशिष शेलार आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले.
आज आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. तसेच या प्रकरणाशी भाजपचा काहीही संबंध नसल्याबाबत स्पष्टीकरण दिले.
उद्धव ठाकरे यांनी दहशतवाद्यांविरोधात भूमिका घेतल्यास आम्ही त्यांचं स्वागत आणि समर्थनच करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरेंनी देशहितासाठी आणि दहशतवादाविरोधातील लढाईसाठी पवारांच्या समोर झुकू नका. झुकेंगे नही हा नारा देऊन चालणार नाही. तसे वागावे लागेल. मुंबई पोलिसांना आदेश द्या, दाऊदचे गुंडे हस्तक आणि राजकीय हस्तकांवर एफआयआर दाखल करायला सांगा. अशा किती मालमत्ता आणि आर्थिक व्यवहार दाऊद सोबत झाले त्याचा तपास व्हावा, असं शेलार म्हणाले.