महाराष्ट्रराजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी एक मंत्री ईडीच्या रडारवर

Share Now

महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्र्यांच्या पाठीमागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. मनी लॉन्ड्रिंग आणखी एका मंत्र्याची चौकशी होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना काही दिवसांपूर्वीच अटक केलेली असताना आता आणखी एका मंत्र्याला ईडीने दणका दिला आहे. अहमदनगरमधील राष्ट्रवादीचे नेते आणि ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नागपूर येथील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची १३ कोटी ४१ लाख रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ऑगस्ट २०१९ मध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने प्राजक्त तनपुरे यांच्या साखर कारखान्याबाबत चौकशी सुरू होती. तसेच डिसेंबर २०२१ मध्ये तनपुरे यांचा जबाब नोंदवण्यात आला. हा तपास सुरू असताना आता ईडीने तनपुरे यांच्यावर पीएमएलएनुसार कारवाई करत मालमत्ता जप्त केली आहे.

ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी संबंधित नागपूरमधील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची ९० एकर जमीन ईडीने जप्त केली आहे. तसंच इतर ४.६ एकर जमीनही जप्त करण्यात आली आहे. हा साखर कारखाना राज्य सहकारी बँकेकडून नाममात्र दरात तनपुरे यांच्याशी संबंधित कंपनीला विकण्यात आल्याचा आरोप आहे.

केंद्रातील विविध तपास यंत्रणांनी राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांविरोधात कारवाईचा फास आवळला आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची संख्या सर्वाधिक आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख काही महिन्यांपासून अटकेत आहेत. तसंच नवाब मलिक यांच्यावरही काही दिवसांपूर्वीच अटकेची कारवाई करण्यात आली असून ते ईडी कोठडीत आहेत. आता कारवाई झालेल्या प्राजक्त तनपुरे यांच्यावर राज्यमंत्रिपदाची जबाबदारी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *