शिवजागराने शिवजयंती साजरी केली जाणार, आ.अंबादास दानवेची माहिती
औरंगाबाद : हिंदुस्थानातील सर्वात उंच असा अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा क्रांतीचौकमध्ये स्थापन झाला असून तो आनंद व शिवजयंती या निमित्ताने दिनांक १५, १६, १७ व १८ फेब्रुवारी रोजी ‘शिवजागर’ उत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले आहे.
या उत्सवात औरंगाबाद शहरात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. शिवसेना नेते पालकमंत्री सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनात होणाऱ्या या उत्सवास ध्वजारोहणाने १५ फेब्रुवारी रोजी क्रांती चौकातुन सुरुवात होणार आहे. १५,१६,१७ रोजी शहरातून तब्बल ३६ शिवमशाल एका रथावरून क्रांतीचौकात पोहोचणार आहेत. या शिवमशाली यात्रेचे नेतृत्व शिवसेनेचे सर्व उपशहर प्रमुख करतील, त्याचप्रमाणे महिला आघाडी, दलित आघाडी, अल्पसंख्याक आघाडी, वाहतूक आघाडी ,व्यापारी आघाडी स्वतंत्रपणे शिवमशाल यात्रा काढणार आहेत. दररोज सकाळी १० आणि सायंकाळी ४ वा. शहरातील नावाजलेले वाद्यवृंद मानवंदना देणार आहे. रोज सायंकाळी ४. ०० वा महाअभिषेक आणि छत्रपती शिवरायांच्या आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात शहरातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिवचरित्रावर आधारित वक्तृत्व स्पर्धा होणार असून १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी युवा शाहीर गणेश गलांडे आपली शाहीरी गाजवणार आहे. १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुप्रसिद्ध शिवचरित्राचे अभ्यासक प्रदीप साळुंके यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच दि.१८ तारखेला सकाळी १०.०० वा मानवंदना व रात्री ०९.०० ते १२.०० वाजेपर्यंत १,००० तरुण-तरुणींचे पथक महामानवंदना देणार आहे. दररोजच्या कार्यक्रमाचा समारोप साडेतीन पीठ देवींच्या आरतीने होवून आतिषबाजी केली जाणार आहे.