शिवप्रेमींचा अंत पाहू नका.!
औरंगाबाद : शिवजयंतीला आता अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. असे असताना देखील शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाबद्दल प्रचंड गोपनियता महापालिकेच्या वतीने बाळगण्यात येत आहे. अनावरण कोणाच्या हस्ते होणार तसेच महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्यात आल्यामुळे पुतळ्याला हार घालता येणार नाही. यासाठी पर्यायी व्यवस्था काय करण्यात आली आहे. याबाबत महापालिकेकडून कुठलेही स्पष्टीकरण आलेले नाही. त्यामुळे शिवप्रेमींच्या संयमाचा अंत पाहू नका, असा इशारा शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने आता देण्यात आला आहे.
क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची व चबुतऱ्याची उंची वाढविण्यात यावी. ही शिवप्रेमींची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. अखेर तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शिवजयंतीच्या मुहूर्तावर यावेळेस स्मारकाचे काम पूर्ण झाले व पुतळादेखील बसविण्यात आला आहे. परंतु आता प्रश्न आहे तो पुतळ्याच्या अनावरणाचा. तो कुणाच्या हस्ते करायचा व कधी करायचा. शिवप्रेमींची काय इच्छा आहे, त्यांची काय मागणी आहे. महापालिकेचे काय नियोजन आहे. यावर महापालिका प्रशासक काहीही बोलायला तयार नाहीत. महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकांना जाब विचारायला कुणीच नाही म्हणून प्रशासक मनमानी करत असल्याचा आरोप शिवप्रेमींकडून करण्यात आला आहे.