MPSC देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोगाने केली महत्वाची घोषणा
एमपीएससीच्या विद्यार्थ्यासाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या महामारीत राज्यातील भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती.
आता एमपीएससी (MPSC) परिक्षेसाठीची वयोमर्यादा ओलांडणाऱ्या हजारो उमेदवारांना राज्य सरकारकडून दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांना ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ज्या विभागाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध होतील, अशा परीक्षेला विशेष बाब म्हणून एकवेळ बसण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी आता वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.
१ मार्च २०२० ते १७ डिसेंबर २०२१ या कालावधीत कमाल वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांकरीता अर्ज सादर करण्याकरिता सुरूवात करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात आली. अशा विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरता येणार आहेत. तसेच अर्ज करण्याची अंतिम दिनांक ९ फेब्रुवारी २०२२ आहे.
कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना परिक्षेला बसता येणार नव्हते, परंतु राज्य शासनाने या विद्यार्थ्यांना एक संधी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीबाबत १ मार्च २०२० पासून जाहिराती प्रसिध्द न झाल्यामुळे शासनाने संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमाद्वारे अथवा संदर्भाधीन २५ मार्च २०१६ च्या शासन निर्णयाद्वारे नियुक्तीकरिता विहित केलेली कमाल वयोमर्यादा, दिनांक १ मार्च २०२० ते या शासन निर्णयाच्या दिनांका पर्यंतच्या कालावधीत, ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे, अशा उमेदवारांना या शासन निर्णयाच्या दिनांकापासून दिनांक ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात ज्या जाहिराती प्रसिध्द होतील, त्या जाहिरातीसाठी ‘एक वेळची विशेष बाब’ म्हणून परीक्षेस बसण्याची संधी देण्यात येत आहे. असं राज्य शासनाने काही दिवसांपुर्वी घेतलेल्या निर्णयात म्हटलं होतं.
जा.क्र.१४३/२०२१ ते २१२/२०२१ करीता दिनांक १ मार्च २०२० ते १७ डिसेंबर २०२१ या कालावधीत कमाल वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांकरीता अर्ज सादर करण्याकरीता वेबलिंक सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक:-९ फेब्रुवारी, 2022. pic.twitter.com/W58wmSzVgP
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) February 4, 2022