बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात, सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्याबद्दल केलं आक्षेपार्ह वक्तव्य
सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे. राज्य महिला आयोगाने या वक्तव्याची गंभीर दखल घेतली असून महिलांबाबतचं अशा प्रकारचं वक्तव्य खपवून घेणार नाही असा इशारा दिला होता. सातारा पोलिसांनी बंडातात्यावर कारवाई करून अहवाल दोन दिवसात सादर करण्याचा, आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिला होता. त्यानुसार बंडातात्या कराडकर यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बंडातात्या कराडकर यांनी साताऱ्यात सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करताना दारु तसंच राजकीय नेत्यंसंबंधी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत होता.
सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य !
महाविकास आघाडी सरकारच्या वाइन विक्रीधोरणाविरोधात बोलताना प्रसिद्ध कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर सर्वपक्षीय महिला नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला व प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे. असं ट्विट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलं.
बंडा तात्या कराडकर यांनी खासदार सुप्रियाताई सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केल आहे, ते अत्यंत संतापजनक आहे. त्यांच्या या वक्त्व्यामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला व प्रतिष्ठेला धक्का पोचलेला आहे. याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असुन 1/2 pic.twitter.com/C62NKA3moP
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 3, 2022