राज्य सरकारच्या मॉल सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री निर्णयाच्या विरोधात एमआयएमच्या वतीने आंदोलन
औरंगाबाद – राज्य शासनाने मॉल आणि सुपरमार्केटमध्ये वाइन विक्रीसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे . राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली होती. आज इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात एमआयएम पक्षाच्या वतीने शहरात आंदोलन करण्यात आलं. शहरातील एका जरी दुकानात वाइन आली तर मी स्वतः हे दुकान आधी फोडणार, असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता. हिंमत असेल तर माझ्या औरंगाबाद शहरात वाइन दुकानात ठेवून दाखवा, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला होता. एमआयएमने शहरातील क्रांती चौकात सरकारच्या वाइन विक्री धोरणा विरोधात आंदोलन केले .
शहरातील क्रांती चौक येथे घोषणाबाजी
सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीला परवानगी देणाऱ्या निर्णयाचा औरंगाबाद एमआयएम पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे . आज गुरुवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी क्रांती चौकात आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आले . यावेळी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी फलक हातात धरून सरकार विरोधात घोषणा दिल्या. आघाडी सरकारच्या सुपर मार्केटमध्ये विक्री निर्णयाचा ए आय एम आय एम औरंगाबादच्या वतीने क्रांती चौकात सरकारच्या विरोधात घोषणा देत निदर्शने करण्यात आली.