मॅट्रिमोनिअल साईट्मुळे झाला तरुणीवर शारीरिक अत्याचार आणि फसवणूक

पुणे : बलात्कार, अत्याचार अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांमंध्ये वाढ होत आहे. अशा अनेक घटना समोर येत असल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील उभा राहतोय. आता गुन्हेगारांनी मॅट्रिमोनिअल साईट्सला आपलं लक्ष बनवलं असल्याचंही विविध घटनांद्वारे दिसून येतंय. अशातच, पुण्यातील पिंपरीत कारमध्ये 30 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणीची आरोपीसोबत मेट्रोमोनिअल साईटवरून ओळख झाली होती. या प्रकरणी वाकड पोलिसात पीडित तरुणीने तक्रार दाखल केली आहे. पीडित तरुणी पिंपरी-चिंचवड मधील वाकड परिसरात वास्तव्यास आहे. तिने लग्न जमवण्यासाठी एका मेट्रोमोनिअल साईटवर नावनोंदणी केली होती. आरोपीने तिला प्रोफाईल बघून रिक्वेस्ट पाठवली. यातूनच दोघांची मैत्री झाली. आरोपीने तरुणीला तो सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ अग्रीकल्चर अँड फार्मर वेलफेअर येथे डेप्युटी डायरेक्टर म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले. ओळख वाढल्याने दोघे ही दररोज व्हॉटसऍप चॅटिंग करत. याशिवाय, एकमेकांसोबत कार मधून फिरायला लागले. पुढे तरुणाने तू मला आवडतेस आपण लग्न करू” अस पीडितेला सांगितलं. ही बाब, पीडित तरुणीने घरच्यांना सांगितली. त्यानंतर पीडित तरुणी आणि आरोपी हे एकमेकांना जास्त भेटायला लागले. दरम्यान, आश्विकने पीडितेसोबत जवळीक करण्याचा प्रयत्न करत शारीरिक संबंध ठेवण्यास बळजबरी केली. पण, आपण अगोदर लग्न करू मगच शारीरिक संबंध ठेवू यावर तरुणी ठाम होती. तिने तसं आरोपीला सांगितलं आणि संबंध ठेवण्यास नकार दिला.

दरम्यान, आपली मैत्री अधिक घट्ट होत असल्याचे पाहून आश्विकने तरुणीला आपण एक व्यवसाय करू असं सुचवलं. कस्टममधील आलेल्या वस्तू कमी किमतीत घेऊन त्यांच्या विक्रीचा व्यवसाय करू असं पीडित तरुणीला सांगितलं. त्यासाठी मी 30 लाख रुपयांची जुळवाजुळव केली आहे. मात्र, 10 लाख रुपये कमी पडत असल्याने “तू मला मदत कर” असे आरोपीने म्हटले.तेव्हा, पीडितेने त्यास नाही असं स्पष्ट सांगितलं. मात्र, आता आपलं लग्न होणार असून भविष्यात आपलं आयुष्य सेट होईल असं सांगत विनवणी केली. त्यानंतर, पीडित तरुणीने आरोपीला 8 लाखांची मदत केली. एवढंच नव्हे, तर आरोपीनं एका जीपमध्ये पीडितेवर लैंगिक अत्याचार केले आहेत. यानंतर विकृतीचा कळस गाठत आरोपीनं पीडितेला वाकडमधील एका हॉटेलच्या पाठीमागे घेऊन जात कारमध्ये तिच्यावर बलात्कार केला आहे.

आईला कोविड झाल्यामुळे मध्य प्रदेश येथे गेल्याचं आश्विकने सांगितलं. तो पुण्यात आल्यानंतर भेटतो असं म्हणाला होता परंतु, त्यानंतर आरोपीचा मोबाईल नंबर बंद येत होता. त्यानंतर संबंधित तरुणी ते राहत असलेल्या पत्त्यावर गेली असता आरोपी फ्लॅट सोडून गेल्याचे समोर आले. तेव्हा तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. बलात्कार, तसेच आर्थिक फसवणूक झाल्याने संबंधित तरुणी नैराश्यात गेली. मात्र स्वतःला सावरत तिने पोलिसात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी वेगाने तपास केला. दरम्यान, आरोपी अश्विकसह त्याच्या एका मित्राला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर हे अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *