आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवी नियमावली
आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवी नियमावली
कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे केंद्र सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे, विशेषतः आंतरराष्ट्रीय प्रवाशांना ही नियमावली लागू राहील. नियमावलीनुसार- भारतात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना ७ दिवस होम क्वारंटाईन राहणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे हे प्रवासी ओमायक्रॉनबाधित देशांच्या यादीत असो किंवा नसो, त्या सगळ्यांना ७ दिवसांचा होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करावाच लागणार आहे.
ओमायक्रॉनचा धोका असलेल्या देशांच्या यादीत समाविष्ट देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांच्याहोम क्वारंटाईनच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे.
जगभरात ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असताना भारतात देखील ओमायक्रॉन बाधितांची संख्या ३ हजारांच्या वर गेली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. नवी नियमावली येत्या ११ जानेवारीपासून लागू होणार आहे.
दरम्यान, ज्या देशांचा समावेश भारतानं ओमायक्रॉन देशांच्या यादीमध्ये केला आहे, अशा देशांमधील प्रवाशांना भारतातील कोणत्याही विमानतळावर उतरल्यानंतर तिथे करोनाची चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यासंदर्भात त्यांनी संबंधित विमान कंपनीला माहिती द्यायची आहे. त्यांची चाचणी निगेटिव्ह आली, तरी त्यांना होम क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. मात्र, जर त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली, तर त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन व्हावं लागणार आहे.