तस्करीमुळे कोकणातील खवले मांजर वन्यजीवाचे अस्तित्व धोक्यात
कोकणातील खवले मांजर तस्करीच्या विळख्यात – संवर्धनासाठी तातडीच्या उपाययोजना गरजेच्या
कोकणातील वन्यजीव संवर्धनाला मोठा धोका निर्माण झाला आहे, कारण गेल्या काही वर्षांत खवले मांजराच्या तस्करीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा हा निशाचर प्राणी जादूटोणा आणि औषधनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररीत्या तस्करीला जातो. यामुळे या प्रजातीच्या अस्तित्वाला गंभीर धोका निर्माण झाला असून वन्यजीव अभ्यासकांनी यावर तातडीने पावले उचलण्याची गरज व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र तस्करीच्या घटनांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर
ट्रेड रेकॉर्डस ॲनालिसिस ऑफ फ्लोरा अँड फौना इन कॉमर्स (TRAFFIC) आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडिया (WWF-India) यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, भारतात अवैध वन्यजीव व्यापाराच्या घटनांमध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. देशभरात गेल्या एका वर्षात तब्बल १,२०३ खवले मांजरांची शिकार व तस्करी झाल्याची नोंद आहे. कोकणातील श्रीवर्धन, मुरुड, अलिबाग, महाड, खोपोली, सुधागड पाली, कर्जत आणि पनवेल या भागांतून मोठ्या प्रमाणावर खवले मांजर तस्करीच्या घटना समोर आल्या आहेत.
कोकणातील अधिवास आणि तस्करीचे जाळे
कोकणात आढळणारे खवले मांजर सहसा पांढरट-पिवळ्या रंगाचे असते. हे लाजाळू आणि निशाचर प्राणी असून त्यांचे मुख्य खाद्य मुंग्या व वाळवीसारखे कीटक असतात. दाट सावलीची जंगले आणि सदाहरित वनप्रदेश त्यांचा नैसर्गिक अधिवास आहे. तथापि, वाढत्या तस्करीमुळे या प्राण्याचा अधिवास धोक्यात आला आहे.
नेपाळ, चीन, पूर्व आशियाई देश आणि दक्षिण आफ्रिकेत खवले मांजरांना मोठी मागणी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला मोठी किंमत मिळत असल्यामुळे तस्करीत वाढ झाली आहे. कोकणातून तस्करी होणारे मांजर मध्य प्रदेशातील गोरखपूर व इतर पूर्व भागांतून नेपाळमार्गे परदेशात पाठवले जातात.
संरक्षणासाठी व्यापक उपाययोजना गरजेच्या
कोकणातील खवले मांजरांचे संरक्षण करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे भाऊ काटदरे आणि त्यांचे सहकारी तसेच रायगड जिल्ह्यातील सिस्केप संस्था, वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थ संवर्धनासाठी काम करत आहेत. मात्र तस्करीचे प्रमाण लक्षात घेता व्यापक प्रयत्नांची आवश्यकता आहे.
आवश्यक उपाययोजना:
- संरक्षित क्षेत्र निर्मिती: खवले मांजरांचे वास्तव्य असलेली जंगले संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करावीत.
- वनक्षेत्र पुनरुज्जीवन: वनविभागाच्या राखीव जंगलांचा दर्जा सुधारून त्यांचे संरक्षण करणे गरजेचे.
- विशेष वन्यजीव संरक्षण पथक: तस्करी रोखण्यासाठी कार्यतत्पर फोर्सची नियुक्ती करावी.
- जनजागृती मोहीम: स्थानिक संस्था व वन समित्यांच्या माध्यमातून गावागावांत जनजागृती मोहीम राबवावी.
संवर्धनाच्या दिशेने पाऊल उचलल्यास या दुर्मिळ प्रजातीचे अस्तित्व वाचवता येईल. अन्यथा, खवले मांजर नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर उभे असल्याचा इशारा अभ्यासकांनी दिला आहे.