बाबा सिद्दिकींची हत्या, जाणून घ्या पूर्ण घटनाक्रम
१२ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईतील वांद्रे परिसरात काँग्रेस नेते बाबा सिद्दिकी यांची भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली, तर राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली. आता या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड कनेक्शन उघड करत मकोका न्यायालयात ४५०० पानी आरोपपत्र दाखल केले आहे.
दाऊद इब्राहिमचे नाव समोर
मुख्य हल्लेखोर शिवकुमार गौतम याने कबुली दिली की, बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी गँगस्टर अनमोल बिष्णोई याने सुपारी दिली होती. विशेष म्हणजे, या प्रकरणात थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे नाव समोर आले आहे. शिवकुमारच्या म्हणण्यानुसार, सिद्दिकींचा संबंध दाऊद आणि १९९३ च्या मुंबई स्फोटांशी असल्याचे सांगून ही हत्या घडवण्यात आली.
सुपारी कशी देण्यात आली?
गौतमने सांगितले की, अनमोल बिष्णोईने स्नॅपचॅटच्या माध्यमातून संपर्क साधून सिद्दिकी यांची हत्या करण्याचा कट रचला. अनमोलने गौतमला १० ते १५ लाख रुपयांच्या सुपारीचे आश्वासन दिले होते. हत्येपूर्वी, शुभम लोणकर नामक व्यक्तीने गौतमला सांगितले की, शस्त्रे अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ बब्बू सिंह नावाच्या व्यक्तीकडून मिळतील.
हत्येची आखणी आणि अंमलबजावणी
४ सप्टेंबर रोजी गौतमला दोन पिस्तुलं आणि काही काडतुसं देण्यात आली. त्यानंतर सिद्दिकींच्या घर आणि कार्यालयाची रेकी करण्यात आली. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी, दसऱ्याच्या दिवशी, धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंग या साथीदारांसह गौतमने सिद्दिकींची हत्या केली.
रात्री ९ वाजता, बाबा सिद्दिकी कार्यालयातून बाहेर पडत असताना, हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. स्प्रेचा वापर करून हल्ल्याच्या जागेवर गोंधळ निर्माण करण्यात आला. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले.
हत्या केल्यानंतरची कारवाई
हत्यानंतर, शिवकुमारने कपडे बदलून शस्त्रे आणि मोबाईल नष्ट केले. नोव्हेंबरपर्यंत तो देशभरात विविध शहरांमध्ये लपून राहिला, पण नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात उत्तर प्रदेशमध्ये त्याला अटक करण्यात आली.
२६ आरोपींच्या नावांचा समावेश
मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात २६ आरोपींची नावे आहेत. त्यापैकी शुभम लोणकर, अनमोल बिष्णोई, आणि यासीन अख्तर यांना वाँटेड म्हणून घोषित करण्यात आले आहे.
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाने मुंबईतील गुन्हेगारी जगत आणि अंडरवर्ल्डच्या हालचालींवर पुन्हा प्रकाश टाकला आहे. या प्रकरणाचा तपास पुढे कसा जातो आणि न्यायालयीन प्रक्रिया काय वळण घेते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.