दावोस करार , किती गुंतवणूक विदेशी मुख्यमंत्र्यांचा दावा काय ?
यंदाच्या दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने तब्बल १५.७ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी विक्रमी सामंजस्य करार केले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विशेष म्हणजे, या गुंतवणुकीपैकी ९८ टक्के गुंतवणूक विदेशी कंपन्यांमधून येणार आहे, असा दावाही त्यांनी केला. या गुंतवणुकीमुळे १५.९५ लाख नोकऱ्यांची निर्मिती होण्याची अपेक्षा आहे.
परिषदेत सादर केलेले आकडे
परिषदेनंतर पत्रकार परिषद घेताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यंदा झालेल्या करारांबाबत माहिती दिली. त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील गुंतवणुकीची तुलनाही केली. ते म्हणाले, “त्या काळात ५०-७५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी करार झाले असले, तरी प्रत्यक्षात फक्त ३५-४० टक्के करारांचीच अंमलबजावणी झाली. मात्र, गेल्या वर्षी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या करारांची ९५ टक्के अंमलबजावणी करण्यात यश मिळाले.”
संतुलित विकासावर भर
यंदाच्या करारांत गडचिरोलीसह राज्याच्या विविध विभागांमध्ये कृषीप्रक्रिया, सौरऊर्जा, संरक्षण, विद्युत वाहने आणि इतर क्षेत्रांमध्ये गुंतवणूक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ५४ गुंतवणूक करार आणि ७ धोरणात्मक करार करण्यात आले असून, यामुळे राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
नवीन प्रकल्प आणि कृत्रिम बुद्धिमत्ता
राज्यात नवी मुंबईत इनोव्हेशन सिटी उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून, तो जागतिक स्तरावर महाराष्ट्राला नवी ओळख देईल. याशिवाय, राज्य सरकारने गुगल कंपनीसोबत कृत्रिम बुद्धिमत्तेचा तंत्रज्ञानविकास करण्यासाठी करार केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे भविष्यात नोकऱ्यांचे स्वरूप बदलण्याची शक्यता असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.
मुंबई-पुणे क्षेत्रात मोठी गुंतवणूक
गुंतवणुकीच्या संख्येचा विचार करता, एक तृतीयांशहून अधिक गुंतवणूक (सुमारे ६ लाख कोटी रुपये) मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (MMRDA) आणि पुणे क्षेत्रात होणार आहे. उत्तर महाराष्ट्रात ३०-३५ हजार कोटी, तर मराठवाड्यात २०-२५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.
औद्योगिक विकासाच्या दिशा
२०१५ पासून दावोस येथे झालेले करार आणि प्रत्यक्ष सुरू झालेले उद्योग यांचा तपशील लवकरच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. ते म्हणाले, “यंदा झालेल्या करारांची अंमलबजावणी वेळेत पूर्ण केली जाईल. टीकाकारांना संधी मिळणार नाही.”
राजकीय आरोप-प्रत्यारोप
दावोस करारांवर विरोधी पक्षांनी टीका केली आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी दावोस येथे झालेले करार मुंबईतच मुख्यालय असलेल्या कंपन्यांशी झाल्याचा दावा केला. तसेच, विरोधी पक्षनेते रोहित पवार यांनी “मुंबई-पुण्यातील कंपन्यांसोबत करार करण्यासाठी दावोसला जाण्याची गरज काय?” असा सवाल उपस्थित केला. त्यावर फडणवीस यांनी विरोधकांकडून असलेल्या टीकेला असुयेचा भाग असल्याचे सांगून, सरकारच्या कामगिरीवर जनतेचा विश्वास असल्याचा पुनरुच्चार केला.