बीड जिल्हा गुन्हेगारीची गुहा:- चक्क दोन सख्या भावांचा खून !
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यभर खळबळ उडवली होती. या घटनेने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. संतोष देशमुख हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, असा जनमानसात प्रचंड दबाव असताना देखील बीडमधील गुन्हेगारी घटना थांबताना दिसत नाहीत. गुरुवारी रात्री आष्टी तालुक्यातील वाहिरा गावात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
वाहिरा गावात रात्री तीन भावांवर काही लोकांनी लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या भयंकर हल्ल्यात अजय भोसले आणि भरत भोसले या दोन भावांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरा भाऊ, कृष्णा भोसले, गंभीर जखमी झाला. स्थानिक पोलिसांनी घटनेनंतर काही संशयितांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू केली आहे. मात्र, या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. शवविच्छेदन प्रक्रिया आष्टी ग्रामीण रुग्णालयात सुरू असून, अंभोरा पोलीस ठाणे आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी या घटनेचा सखोल तपास करत आहेत.
जिल्ह्यातील वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. विशेषतः संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अशा गुन्ह्यांवर ठोस कारवाईची अपेक्षा होती. मात्र, वाहिरा गावातील या घटनेने पुन्हा एकदा पोलिस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी आष्टी मतदारसंघातील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा नेहमीप्रमाणे आक्रमकपणे मांडला असून, या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे.
या हल्ल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.