संसद काळात पंतप्रधान असतात कुठे.?
संसदेत पहिल्यांदाच प्रवेशताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनाच्या पायऱ्यांवर माथा टेकवत आपली आस्था प्रकट केली होती. नंतर मात्र मोदी यांनी संसद सुरु असताना येणे सातत्याने टाळले. नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात तर मोदी यांनी केवळ एक दिवस हजेरी लावल्याची नोंद झालीय. एकीकडे पंतप्रधान अठरा अठरा तास काम करतात याचे कौतुक देशभरात होत असते. संसद अधिवेशन तर देशाच्या अनेक प्रश्नांना उत्तरं शोधणारे सर्वोच्च ठिकाण मानले जाते आणि दुसरीकडे त्याकडे पाठ फिरवायची. यंदा तर अधिवेशन काळात मोदी यांनी तब्ब्ल १२-१३ वेळा उत्तर प्रदेशचा दौरा केला. जणू संसद आपले बाकीचे सहकारी सांभाळतील, माझे ते काम नाही या अविर्भावात त्यांनी आपले लक्ष आगामी निवडणुकांवर केंद्रित केले. बहुमताचा हा आदर म्हणावा की अनादर? बहुमत असल्याने मनाप्रमाणे वर्तन करताना किमान अधिवेशन काळात संसदेत उपस्थित राहून विरोधकांना सामोरं जाणं अपेक्षित होते. पण नुकतेच मागे घ्यावे लागलेले कृषी कायदे, लखीमपूर प्रकरण, देशभरात वाढती महागाई या ज्वलंत विषयांना बगल देत पंतप्रधांनी उत्तर प्रदेश दौऱ्यांना दिलेले प्राधान्य म्हणजे केवळ निवडणुका जिंकणे हेच भाजपचे प्राधान्य आहे याचा हा दाखला ठरावा.
कधीकाळी संसद हे माझ्यासाठी मंदिर आहे आणि घटना ही गीता असं सांगणारे पंतप्रधान आता या मंदिराकडे पाठ का फिरवतात हे कोडेच आहे. गेल्या तीन वर्षात तर त्यांची उपस्थिती नगण्य असल्याचे दिसून येते. चर्चेत सहभागी होणे, प्रश्नांना उत्तरे देणे हा कदाचित त्यांचा अजेंडा नसला तरी पंतप्रधान म्हणून संसदेत काही मुद्दे त्यांनी मांडले तर देशाला त्यांचे आत्मविश्वासाने प्रश्नांना सामोरं जाणं कौतुकाने बघता येईल. बजेट सत्रात तरी पंतप्रधान पूर्णवेळ उपस्थित राहतील ही अपेक्षा आहे.
आता नवीन संसद भवनाची उभारणी होत आली आहे, ती झाल्यावरच संसदेत येणार असा पण तर पंतप्रधानांनी केला नाही ना ?[lock][/lock]