उद्यापासून सुरु होणारे अधिवेशन कोण घालणार कुणाला वेसण !
मुंबईत उद्यापासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे, नागपूर टाळून सरकारने एक गुण आपसूक आपल्या खात्यात टाकून घेतला आहे. आता उद्यापासून होणारे अधिवेशन नेमके कोण कोणते गोंधळ अनुभवते हे बघायला मिळेल. मुख्यमंत्री ठाकरे तब्बल चाळीस दिवसांनंतर पुन्हा ऍक्टिव्ह मोड मध्ये दिसणार आहेत. सरकारसमोर प्रश्नांची मोठी यादी आहे, या परीक्षेतील प्रश्नांना सरकार कसे सामोरे जाते हे राजकीय दृष्ट्या लक्षणीय राहील.
एसटी संप, आरोग्य कर्मचारी भरतीमधील पेपरफुटी, मंत्र्यांवरचे भ्रष्टाचाराचे आरोप, शिक्षक पात्रता परीक्षा, म्हाडाच्या भरतीचा गोंधळ आणि त्यावर कडी म्हणजे आघाडीतील कुरबुरी या सगळ्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन सुरु होत आहे.
केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा आणि भाजपाची त्यात लुडबुड हा मुद्दाही अधिवेशनात आक्रमणाचा मुद्दा राहील. महत्त्वाचे म्हणजे विधान सभा अध्यक्ष निवडणूकीदरम्यान मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे. आवाजी मतदानाने निवडणुकीचा ठराव आणि त्यावर विरोधकांची भूमिका हे संघर्षाचे आणखी एक कारण आहे. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त आहे. प्र.कुलपतीचा विषयही अधिवेशनात गाजू शकतो.