महाराष्ट्रातील राजकारण आणि ऋतू कायम रंग बदलतायत !
राज्यात गेली दोन वर्ष राजकीय रंग सतत बदलत आहेत. राजकीय तराजू पारडे वर खाली होताना दिसत असते, तसेच काहीसे हवामानाचे झाले आहे.
हिवाळा सुरु असताना अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभर थंड वातावरण झालेले आहे. त्याचबरोबर आज आणि उद्या म्हणजेच 1 डिसेंबर आणि 2 डिसेंबर रोजी अवकाळी पावसाची शक्यता असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहिती नुसार, संपूर्ण राज्यात दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबारसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईमध्ये पावसाच्या हलक्या सरी सुरु असून राज्यभरातील विविध भागांत दिवसभर ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पाऊस अनुभवायला मिळणार आहे.
सध्या मुंबईचं वातावरण किमान सरासरी तापमान १३.८ अंश सेल्सिअसवर पोहोचले असून मच्छिमारांना आज आणि उद्या समुद्रात नं जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. उद्या उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात वाऱ्याची तीव्रता वाढणार असून दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टी भागात आज वाऱ्यांचा वेग जास्त असणार आहे. परंतु या अवकाळी पावसामुळे नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. आता परत डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी पावसाच्या सरीनी सर्वत्र थंड वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून अशी माहिती समोर आली आहे की, ३० नोव्हेंबर पासून अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्यामुळे आंध्र प्रदेश, तामिळनाडू याठिकाणी पाऊस सुरु आहे. परंतु विदर्भामध्ये पाऊस नसून थंडीने जोर धरला आहे. विदर्भातील बऱ्याच ठिकाणचे किमान सरासरी तापमान १५ अंश सेल्सिअस च्या खाली आल्यामुळे अनेक ठिकाणी गारवा निर्माण झाला आहे.
३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी बारीक पाऊसाची शक्यता असून उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. औरंगाबादसह पालघर, ठाणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या ठिकाणी १ ते २ डिसेंबरला पाऊस पडेल
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण याठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज तर कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला. या येलो अलर्टच्या ठिकाणी मेघगर्जनांसह पावसाची शक्यता असून १५ मिमी ते ६४ मिमीपर्यंतच्या पावसाचा अंदाज आहे.