Uncategorizedमहाराष्ट्र

सायबर क्राईमचा हा “प्राईम टाईम” !

Share Now

ऑनलाईन च्या बाजारात गुन्हे जोरात

ऑनलाईन चा जमाना आहे, अनेक कामं सोप्पी झाली. या लोकडाऊन काळात तर तर ऑनलाईन ने तारले. गेल्या दहा वर्षात जेवढे ऑनलाईन व्यवहार झाले तेवढेच किंबहुना त्यापेक्षाही जास्त व्यवहार गेल्या एक दीड वर्षात झाले असतील. कोरोनाने सगळ्यांना घरात जखडून टाकले आणि बघता बघता ऑनलाईन ने दिवस व्यापून टाकला. या काळात ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करण्याचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे दिसत आहे. याचा उपयोग करून अनेक जणांनी उत्पन्न खंडित होऊ दिले नाही. हे चित्र एकीकडे असताना याच ऑनलाइनच गैरफायदा घेत अनेकांनी आपले हात धुऊन घेतल्याचे दिसते.. सायबर क्राईम रेट कमालीचा वाढला आणि सोबत मोठी डोके दुखीही. सात वर्षांपूर्वी देशभरात ऑनलाईन फसवणुकीची पाच हजार प्रकरणे होती तिथे २०१८ मध्ये २७ हजारावर ऑनलाईनचे गुन्हे घडले तर अवघ्या दोन वर्षात ही संख्या पन्नास हजारांवर गेली.

सायबर क्राईम म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून केलेला गुन्हा. आतापर्यंत सायबर क्राईममुळे फक्त महिलांना जास्त त्रास होतो असे सांगितले जात होते, परंतु आता सायबर क्राईम मुळे महिलांसोबतच पुरुष मंडळी आणि युवा पिढीलाही या त्रासाला सामोरे जावे लागते. बघूया सायबर क्राईमचा हा खास रिपोर्ट

कोरोनामुळे पैशांची देवाणघेवाण करताना संसर्ग टाळावा यासाठी ऑनलाइन पेमेंट करणे, ऑनलाइन पद्धतीने अमेझॉन फ्लिपकार्ट यासारख्या ॲप वरून खरेदी करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले, नुसता भाजीपाला घ्यायचा असेल तेव्हाही लोक ऑनलाइन पद्धतीचा वापर करू लागले. आणि सायबर क्राईम गुन्हेगारांना संधी मिळाली . या काळात अमेझॉन सारखीच डुप्लिकेट साईट ओपन करून त्याद्वारे सोशल मीडियावर कमी आणि आकर्षक किमतीत कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कॉस्मेटिक्स यांच्या जाहिराती देऊन लोकांना प्रभावित करण्यात आले. आणि ही साईट ओपन केल्यावर ऑर्डर देऊन पैसे उकळण्यात आले आणि ऑर्डर केलेले साहित्य पाठवण्यात आलेली नाही. हे एक सायबर गुन्ह्यांचे उदाहरण झाले.

याकाळात महिलांची फसवणूक तर झालीच आणि काही महिलांनी आणि त्यांच्या टोळीने युवा पिढीला देखील मोठ्या प्रमाणात गंडवले. युवा पिढी सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते. याचाच फायदा घेत सायबर गुन्हेगारांनी सोशल मीडियाद्वारे अननोन नंबर वरून व्हिडिओ कॉल केले आणि हा कॉल उचलला असता या यामध्ये एक महिला दाखवली जी अश्लील चाळे करत होती. त्याचबरोबर या टोळीने ही व्हिडिओ क्लिप रेकॉर्ड करून मला तुम्ही कॉल करुन हे कृत्य करण्यास सांगितलं होतं हे सांगून बदनामी करेल असं म्हणत पैसे उकळण्यास सुरुवात केली होती. हा दुसरा प्रकार सुरु झाला.

आणखी एक घटना म्हणजे मोबाईलच्या एका क्लिकवर पैसे दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करणे. यामध्ये फेक मोबाईल नंबर वरून अकाउंट अपडेट करण्यासाठी, लॉटरी लागलेली असल्याचे सांगून किंवा कॉंफॉर्मेशनसाठी कॉल केला जातो. यावेळी मोबाईल नंबर, संपूर्ण नाव, आई-वडिलांचे नाव, बँक अकॉउंट नंबर आणि आयएफसी कोड मागवून घेण्यात येतात. आणि मोबाईलवर ओटीपी कोड सेंड करण्यात आला असून तो सांगण्यास प्रवृत्त केले जाते. आणि हा कोड समोरच्या व्यक्तीने सांगितला की दुसऱ्या सेकंदाला बँकेतील पैसे काढून घेण्यात असल्याचा मेसेज येतो. पण या मॅसेज नंतर कोणी काही करू शकत नाही. कारण ही टोळी लगेच सिम कार्ड चेंज करून दुसरा मोबाईल नंबर ऍक्टिव्ह करतात. परंतु सामान्य माणसाला याचा प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. कोरोना काळात अशा टोळ्यांनी तर हाहाकार माजवला होता.

२०२० मध्ये देशात घडलेल्या सायबर गुन्हेगारी यामध्ये ऑनलाईन बँकिंग फ्रॉड करण्यात आला. तेव्हा ४ हजार ४७ गुन्हे नोंदवण्यात आले असून ओटीपी फ्रॉड मध्ये १ हजार ९३, क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड फ्रॉड मध्ये १ हजार १९४, एटीएम अंतर्गत येणारी गुन्हे २ हजार १६० आणि महिला व बालकांच्या संबंधित गुन्हेगारी मध्ये ९७२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

भारतात सायबर क्राईमचे २०१३ ते २०२१ या कालावधीत ९ पटीने वाढ झाली आहे. २०१३ मध्ये ५ हजार ६९३ सायबर प्रकरणांची नोंद करण्यात आली होती. भारतामध्ये २०२० मध्ये ५० हजार ३५ प्रकरणांची नोंदणी करण्यात आली होती. तसेच २०१८ मध्ये २७ हजार २४८ प्रकरणांची, २०२० मध्ये ४४ हजार ७३५ प्रकरणांची नोंद करण्यात आली. २०१८ ते २०२० या काळात सायबर गुन्हेगारीत ८५ टक्क्यांनी वाढ झाली. २०१९ आणि २०२० या दोन वर्षात तुलनेत १२ टक्के गुन्हे वाढल्याचे आकडेवारी सांगते. महाराष्ट्रामध्ये सायबर क्राईमच्या ५ हजार ४९६ प्रकरणांची नोंद करण्यात आली असून मागील वर्षी म्हणजेच २०२० मध्ये ५ हजार ३५ प्रकरणे नोंदवण्यात आली.

२०२० मध्ये उत्तर प्रदेश याठिकाणी ११ हजार ९७ प्रकरणांची नोंद तर कर्नाटक याठिकाणी १०, ७४१ तेलंगणा याठिकाणी ५ हजार २४, आसाम – ३ हजार ५३० प्रकरणे नोंदवली असून राज्यामध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सिक्कीम मध्ये शून्य प्रकरणाची नोंद करण्यात आली. २०१९ मध्ये १ लाख लोकसंख्येमागे सायबर क्राईमचे प्रमाण ३.३ एवढे होते. ते वाढून २०२० मध्ये ३.७ इतके झाले. २०२० मध्ये ५० हजार ३५ सायबर गुन्हे, फसवणूक केल्या प्रकरणी ३० हजार १४२ प्रकरणे उघडकीस आली. २०१९ मध्ये ४४ हजार ७३५, २०१८ मध्ये २७ हजार २४८ प्रकरणी सायबर गुन्हे दाखल करण्यात आले आणि २०२० मध्ये वेब मीडियाने पसरवलेल्या खोट्या बातम्या विरोधात ५७८ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या फसवणूकीपासून वाचण्यासाठी ऑनलाईन खरेदी करत असताना,योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. आणि फ्रॉड कॉल ओळखणे देखील महत्वाचे आहे. एकूण सायबर क्राईमचा धोका लक्षात घेता ऑनलाईन व्यवहार जपून करणे अधिक गरजेचे आहे. अशा गुन्ह्यांमध्ये माणूस दिसत नसल्याने गुन्हे सोडवणुकीचे प्रमाणही व्यस्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *