देशात लक्षणीय ठरणार औरंगाबादचा सफारी पार्क !
सफारी पार्क चे आकर्षण आबालवृद्धांना असतेच .. यामुळे अशा पार्ककडे पर्यटकांचा मोठा ओढा असतो. आता लवकरच औरंगाबादमध्ये सफारी पार्क निर्माण होतोय. याचे काम सुरु झाले असून स्मार्ट सिटी निधीतून हा पार्क तयार होईल. अजिंठा-वेरूळ-लोणार, पैठण, औरंगाबाद शहर अशी पर्यटन स्थळं असणाऱ्या या भागात आणखी एक आकर्षणाचे ठिकाण निर्माण होणार असल्याने या परिसरातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल.
सफारी पार्क पर्यटनासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (ASCDCL) २५० कोटी रुपये खर्च करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद मनपा प्रशासकांना मिटमिटा गावानजीकच्या वाइल्डलाइफ सफारी पार्कला लागणारी अतिरिक्त जमीन आणि निधीचा प्रस्ताव सबमिट करायला सांगितला आहे.
औरंगाबाद ७२८ कोटींचा प्रस्ताव :
या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक आयोजित केली होती. ज्यात आमदार संजय शिरसाट, आ. प्रदीप जैस्वाल, अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, शहरी विकास मुख्य सचिव महेश पाठक,विकास खारगे,वेणूगोपाल रेड्डी आणि औरंगाबाद मनपाचे चे प्रशासक अस्तिक कुमार पांडे उपस्थित होते.मनपाने औरंगाबादच्या विविध प्रकल्पांसाठी जिल्हा पालक मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे ७२८ कोटींचा प्रस्ताव ठेवला आहे. प्रशासक अस्तिक कुमार पंडे म्हणाले आहेत की मनपा औरंगाबादच्या २१ प्रकल्पांवर काम करत असून ९० % टक्के काम पूर्ण झाले आहे.
सफारी पार्क:
सफारी पार्क प्रकल्प २०० कोटींचा असून ११८ हेक्टर जागेत तो अंमलात येणार आहे. मनपाने महसूल सचिवांना गट नंबर ३०७ मध्ये चित्ता सफारीसाठी १७ हेक्टर जमीन मिळावी यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. तसेच वाघ सफारी प्रकल्पासाठी गट नंबर ५६ मध्ये ४१.६९ जमिनीचा प्रस्ताव पाठवला आहे.सफारी पार्क प्रकल्पासाठी मनपाकडे कडे निधीची कमतरता नसल्याचे आस्तिक कुमार पांडे यांनी सांगितले आहे.