देश

गोरे रंग पे क्यूँ है गुमान ?

Share Now

गोरा रंग आजही दंग करतोय…

भारतात रंगवाद खूप वर्षांपासून चालत आलेला आहे एकविसावे शतक असूनसुद्धा गोरा आणि काळा रंगांमध्ये मध्ये भेदभाव होत असतो. चार वर्णामधून एखादा वर्ण श्रेष्ठ मानला गेला त्याचे मुख्य कारण त्यांचा रंग होता. फेअरनेस क्रीम आल्यापासून रंगवाद समाजात सामान्य झाला.फेअरनेस क्रीमने रंग खरंच गोरा होतो का? फेअरनेस क्रीम भारतात कशी प्रचलित झाली? जाणून घेऊया-

फेअरनेस क्रीम मुळे रंग खरंच गोरा होतो का?
आपल्या शरीरात मेलानिन या रंगद्रव्यामुळे आपल्या शरीराचा रंग ठरतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये मेलानिनचे प्रमाण वेगवेगळे असते. फेअरनेस क्रीम फक्त उन्हापासून आपले संरक्षण करते ज्यामुळे शरीरातील मेलानिन चे प्रमाण स्थिर राहते.मेलानिन अनुवांशिक असल्यामुळे आपण त्याचे प्रमाण बदलू शकत नाही. फेअरनेस-क्रिमच्या कंपन्यांची रंग गोरा करण्याची हमी खोटी आहे. फेअरनेस क्रीम मुळे रंग गोरा होत नाही. टँनिंग मुळे रंग बदलू शकतो पण मूळ रंग आयुष्यभर तसाच राहतो. त्यामुळे काळ्या रंगाच्या लोकांना रंग बदलवण्यासाठी जे आजपर्यंत हिणवले गेले आहे ते सगळे व्यर्थ आहे.

फेअरनेस क्रीमचे मार्केट आणि त्याचा इतिहास
पहिली फेअरनेस क्रीम अफगाण स्नो १९१९ मध्ये भारतात आली. १९७५ मध्ये ‘हिंदुस्थान युनिलिव्हरने ‘फेअर अँड लवली’ भारतात आणली आणि अल्पावधीत ती लोकप्रिय झाली. १९८० मध्ये फेअरनेस क्रीम च्या मराठी घरांमधूनही दिसू लागल्या. त्यांच्या जाहिरातीत महिला काळ्या रंगाच्या असल्यामुळे त्यांना पती मिळत नाही, विवाह होत नाही. समाजात आदर नाही आणि मग ते क्रीम वापरल्याने त्यांचा गोरा रंग होतो असे दाखवले गेले. अशा प्रकारच्या जाहिराती अजूनही दाखवल्या जातात.
फेअरनेस क्रीमचे भारतातील मार्केट खूप मोठे आहे. २०१९ मध्ये फेअरनेस क्रीमची ३००० कोटींची उलाढाल झाली. ब्लिच मार्केटच्या आढाव्या नुसार फेअरनेस क्रीमचा महसूल २०२३ पर्यंत ५००० कोटींपर्यंत जाऊ शकतो. २०१९ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या अभ्यासानुसार भारतातील स्किन केअर मार्केट मध्ये फेअरनेस क्रीमचा वाटा ५० % आहें. गार्नियर, निव्हिया, पॉण्ड्स यासारख्या मोठ्या कंपन्या फेअरनेस क्रीमच्या व्यापारामध्ये वर्चस्व करतात.बॉलिवूडचे लोकप्रिय आणि सेलिब्रिटी फेअरनेस क्रीमचे ब्रॅण्डिंग करतात. शाहरुख खान दीपिका पदुकोण, यामी गौतम, प्रियंका चोप्रा या मध्ये समाविष्ट आहे. एवढा पैसा आणि प्रसिद्धी असूनही त्यांना फेअरनेस क्रीमला भाव देण्याची काय गरज आहे हा प्रश्न पडतो. प्रियंका चोप्रा ने २००९ मध्ये पॉंड्स क्रीमची एक आक्षेपार्ह जाहिरात आली होती. त्यामध्ये असे दाखवले होते की प्रियंका चोप्राचा रंग काळा असल्यामुळे तिचा पती तिला सोडून जातो जेव्हा ती क्रीम लावून गोरी होते तेव्हा तो तिच्याकडे परत येतो.ओप्राह विन्फ्रेला दिलेल्या नुकत्याच एका मुलाखतीत प्रियंका चोप्राने जाहिरात केल्याचे पश्चाताप होत असल्याचे व्यक्त केले.

समाजातील रंगवाद
काळा रंग म्हणजे कुरूप, गोरा रंग म्हणजे सुंदर अशी व्याख्या वर्षानुवर्षे तयार झाली. लग्न करताना गोरी मुलगीच हवी. मुलीचा रंग जर काळा किंवा सावळा असेल तर ती लग्नासाठी पात्र ठरत नाही. शाहरुख खानचा एका जाहिरातीचे टॅग लाईन ‘कंधा नहीं बंदा बन’ याचा अर्थ असा की मुलगा काळा असेल तर त्याला काहीच महत्व नाही तो गोरा असेल तरच चांगला दिसेल.
“अग !काळी दिसते चेहऱ्याला काय लावते?”, “अरे काळा दिसतोय काहीतरी चेहऱ्याला लाव तरच तुला मुलगी पटेल.” असे वाक्य ज्यांचा रंग काळा किंवा सावळा आहें त्यांना दैनंदिन जीवनात ऐकायला येतात.गोरा रंग म्हणजे सुंदर. समाजात गोऱ्या रंगाचे काळ्या रंगावर वर्चस्व आहें. भारतातील लोक अमेरिका ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ चळवळीचे समर्थन करतील आणि काळ्या रंगाच्या लोकांना हिणवतील, हा दांभीकपणा आता सामान्य होत चालला आहे. नुकतेच हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीने फेयर अँड लवली मधून फेयर शब्द काढून टाकला. फेयर अँड लवलीने रिब्रँडिंग केल्यामुळे रंगवाद संपेल का? फेयर अँड लवलीची मॉडेल गोरी आहे त्यांच्या जाहिरातींचा उद्देश अजूनही काळ्या लोकांना दुय्यम दर्जाचे दाखवण्याचाच आहे. त्यामुळे समाजात अशाप्रकारच्या जाहिरातींचा परिणाम होणारच. गोरे रंग पे गुमान असणाऱ्या आणि फेअर म्हणत अनफेअर जाहिराती करणाऱ्या मंडळींना उत्तर द्यायचे तर त्यासाठीही एक गीत आहेच की, “हम काले है तो क्या हुआ, दिलवाले है”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *