Uncategorized

पंतप्रधान नरेंद्र मोदींना मातृशोक; हिराबेन मोदी यांचे निधन

Share Now

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचं वृद्धापकाळ आणि प्रदीर्घ आजाराने निधन झालं. अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याच वर्षी 18 जून रोजी हीराबेन यांनी 100 व्या वर्षात पदार्पण केलं होतं. त्यांच्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोमभाई, अमरुतभाई, प्रल्हादभाई, पंकजभाई ही मुलं आणि मुलगी वासंतीबेन यांच्यासह सुना, नातवंडे, पतरुंड असा मोठा परिवार आहे. हीराबेन यांच्या निधनावर सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.

हीराबेन यांची तीन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना तात्काळ अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. हीराबेन यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल यांचे प्रधान सचिव के. कैलासनाथन रुग्णालयात गेले होते.

त्यांनी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना भेटून हीराबेन यांच्या प्रकृतीची माहिती घेतली होती. तसेच त्यांच्यावर युद्धपातळीवर उपचार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.

स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदीही अहमदाबादला आले होते. त्यांनी आपल्या आईच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तसेच आईसोबत थोडावेळ घालवला होता. हीराबेन यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र वृद्धापकाळ आणि आजारपण यामुळे हीराबेन यांची प्रकृती अधिकच खालावली. उपचाराला साथ न दिल्याने अखेर त्यांची रुग्णालयातच प्राणज्योत मालवली.
…………………………………………

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *