महाराष्ट्रावर पुन्हा अस्मानी संकट, अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता
महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अस्मानी संकट येण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे.
महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अस्मानी संकट येऊ शकते. याचं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. हवामान विभागाने याला मंदोस चक्रीवादळ असे नाव दिलेय. या चक्रीवादळाचा फटका दक्षिणेकडील राज्यांना जास्त बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ तामिळाडूच्या किनारपट्टीला धडकणार असल्यामुळे 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या दरम्यान वाऱ्याचा वेग 65 किमी प्रतितास ते 85 किमी प्रतितास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्र आणि गुजरातलाही फटका बसण्याची शक्यता आहे.
मुंबईमध्ये पाऊस होण्याची शक्यता –
पुढील आठवड्याची सुरुवात मुंबईमध्ये हलक्या पावसाच्या हालचालींसह होण्याची शक्यता आहे. आयएमडीने आपल्या पाच दिवसांच्या जिल्ह्याच्या अंदाजात म्हटले आहे की 12 डिसेंबर रोजी मुंबईच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. याबाबत ठाण्याच्या तज्ञांनी सांगितले की, या पावसाचे कारण चक्रीवादळ आहे.
महाराष्ट्रात कुठे कुठे पाऊस पडणार?
मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 12, 13, 14 आणि 15 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात, मध्ये प्रदेश आणि गुजरातच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. महाराष्ट्रात मुंबई ,पुणे ,ठाणे, रायगड आणि गोव्याच्या किनाऱ्याजवळ वादळ पुन्हा आले आहे. त्याचा प्रभाव पडल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणासह मुंबई, पुणे, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहणार असून तापमानातील वाढही कायम राहण्याची शक्यता आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1600917110925901824?t=DVtgh5o7XiXvfAMcgxdYng&s=19