हत्या करून मृतदेह गाडीत ठेवला, पोलिसांकडून ८ तासात लावला गुन्ह्याचा छडा
औरंगाबाद :
वाळूजच्या गरवारे कंपनीसमोर बेवारस क्रूझर वाहनात ३५ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी अवघ्या ८ तासांत खुन्याला पकडले आहे. पैशाच्या कारणावरून खून झाल्याचे समोर आले आहे. संशयिताला अटक करण्यात आली असून, त्याची कसून चौकशी केली जात आहे.
क्रूझर चालक सुधाकर पुंडलिक ससाणे (रा. वाघोडा ता. मंठा जि. जालना, ह. मु. मंगलमूर्ती कॉलनी, रांजणगाव शेणपुंजी) असे हत्या झालेल्याचे तर तौफिक रफीक शेख (२४, रा. पत्रा कॉलनी, वाळूज) असे संशयिताचे नाव आहे. गुन्हे शाखा व वाळूज पोलीस या प्रकरणाचा संयुक्त तपास करत आहेत. सुधाकर क्रूझर (क्रमांक एमएच २९ ईवाय ५८२७) किरायाने चालवत होता. १३ नोव्हेंबरला सकाळी आठ वाजता तो भाडे घेऊन जातोय, असे सांगून घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर चार दिवसांपासून त्याचा मोबाइल बंद येत होता.
काल, १५ नोव्हेंबरला मध्यरात्री १२ च्या सुमारास गरवारे कंपनीसमोर एका बेवारस वाहनातून दुर्गंधी येत असल्याची माहिती वाळूज पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. वाहनातील मधल्या सीटवर अर्धनग्न अवस्थेत सुधाकरचा मृतदेह दिसून आला. सुधाकर बेपत्ता झाल्याची तक्रार त्याचा भाऊ सुभाषने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती.
क्रूझरमध्ये दोन मोबाइल मिळून आले होते. यातील एक मोबाइल सुधाकरचा तर दुसरा मोबाइल संशयिताचा असल्याचा अंदाज लावत पोलिसांनी तांत्रिक तपास हाती घेतला होता. त्याआधारे आज, १६ नोव्हेंबरला सकाळी आठच्या सुमारास वाळूजच्या पत्रा कॉलनीत छापा मारून तौफिकला ताब्यात घेतले. कसूनत चौकशीत त्याने पैशाच्या वादातून सुधाकरचा खून केल्याची कबुली दिली आहे.
…………………………………………………………