news

पदविका व पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या मराठी भाषेतील पुस्तकांचे प्रकाशन

Share Now

मुंबई, दि. 14 : भारत आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सकल राष्ट्रीय उत्पादनात माहिती तंत्रज्ञानाचे योगदान मोठे आहे. आत्मनिर्भर भारताच्या मजबूत पायाभरणीसाठी आणि देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी नवीन संशोधनाला चालना देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

मुंबई विद्यापीठ येथे तंत्रशिक्षण संचालनालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांनी निर्मित केलेल्या पदविका व पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या मराठी भाषेतील पाठ्यपुस्तकांचा वितरण सोहळा संपन्न झाला.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील आणि केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार यांच्या हस्ते या पदविका व पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या मराठी भाषेतील पुस्तकांचे प्रकाशन आणि वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास आमदार आशिष शेलार, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रा. जगदेश कुमार, नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रीडीटेशन नवी दिल्ली अध्यक्ष प्रा. के. के. अग्रवाल,अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली उपाध्यक्ष प्रा. एम. पी. पुनीया, तंत्रशिक्षणचे संचालक डॉ.अभय वाघ, महाराष्ट्रातील प्राध्यापक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीच्या दृष्टीने महाराष्ट्राने पावले उचलली आहेत. यामध्ये मातृभाषेतून शिक्षण असावे यावर लक्ष केंद्रित करून बहुभाषिकता आणि मातृभाषेची ताकद नवीन शिक्षण धोरणामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. नवीन शिक्षण धोरणामध्ये भाषांमध्ये शिकण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण देणाऱ्या संस्थांनी प्रादेशिक भाषेत शिकविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी धोरण विकसित करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. तंत्र शिक्षण मातृभाषेतून मिळाले तर विद्यार्थ्यांना विषय लवकर समजेल, नवीन कल्पकता सुचेल आणि ते संशोधनाकडे वाटचाल करतील. पेटंट मिळवतील आणि मातृभाषेतील ज्ञानामुळे आत्मविश्वास सुद्धा वाढण्यास मदत होईल.

हेही वाचा :- सक्तीचे धर्मांतर हा गंभीर मुद्दा , केंद्र सरकारने उपायांची माहिती द्यावी – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश 

देशातील विद्यार्थ्यांना इंग्रजी व्यतिरिक्त प्रादेशिक भाषेमध्येही अभियांत्रिकीचे शिक्षण घेता यावे यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (एआयसीटीई) यांनी देखील पुढाकार घेतलेला आहे. प्रादेशिक भाषेत अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी एआयसीटीईने मान्यतेची प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२१- २२ पासून सुरु केलेली आहे. तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या पुस्तकांचे बारा प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद करण्याचा एआयसीटीईने स्वागतार्ह निर्णय घेतलेला आहे. मराठी भाषेमधील प्रथम वर्षाची अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची ०९ व पदविका अभ्यासक्रमांची ११ अशा एकूण २० पुस्तकांची निर्मिती एआयसीटीईकडून करण्यात आलेली आहे, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

———–//—

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *