मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय – जितेंद्र आव्हाड
आज पहाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी “मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय, असं ट्वीट केलं आहे. माझ्या विरोधात पोलिसांनी 72 तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच, लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, असंही जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमध्ये लिहल आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलं आहे की, “पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केले आणि तेही ३५४. मी या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे. लोकशाहीची हत्या.. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत.”
पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही 😭३५४ ,.,
मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 14, 2022
विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणी काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळीही माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. याप्रकरणी कोर्टाकडून आव्हाडांची जामीनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत जितेंद्र आव्हाडांवर पुन्हा एक गुन्हा दाखल करण्यात आला. एका महिलेनं विनयभंगाची तक्रार दाखल करत आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गेल्या आठवडाभरात जितेंद्र आव्हाडांवर दाखल होणारा हा दुसरा गुन्हा आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी-जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
प्रकरण नेमकं काय ?
रविवारी, 13 नोव्हेबंर 2022 रोजी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. याच कार्यक्रमात आव्हाडांविरोधात तक्रार करणारी महिलाही उपस्थित होती. याच कार्यक्रमात विनयभंग झाल्याचा दावा तक्रारदार महिलेनं केला आहे. 40 वर्षीय तक्रारदार महिलेनं या कार्यक्रमात आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीनं शरीराला स्पर्श करत बाजूला केल्याचा दावा केला आहे. त्यानंतर महिलेने स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पोलिसांनी महिलेला तक्रार दाखल करण्यास सांगितलं. दरम्यान, मुंब्रा पोलीस ठाण्यात महिलेनं जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली. याच तक्रारीवरुन पोलिसांनी आव्हाडांविरोधात कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.