औरंगाबाद शहर फेब्रुवारीपर्यंत चकचकीत कारण..
जी-२० शिखर परिषद यंदा भारतात होणार असून, १३ आणि १४ फेब्रुवारी २०२३ रोजी विविध देशांची शिष्टमंडळे औरंगाबादला भेट देऊ शकतात.
पाहुण्यांसमोर शहर अस्वच्छ दिसायला नको म्हणून महापालिकेने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. शनिवारी प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी रस्त्यांची स्वच्छता, दुभाजक, चौकांचे सुशोभीकरण, डागडुजीची कामे युद्धपातळीवर करण्याचे आदेश दिले.
विमानतळापासून शहरातील विविध पंचतारांकित हॉटेलपर्यंतचे सर्व रस्ते चकचकीत ठेवा. हॉटेलपासून वेरूळ, मकबरा, पाणचक्की अजिंठ्याकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरील दुभाजकांचे सुशोभीकरण करावे, दुभाजकांची रंगरंगोटी व वृक्षारोपण करावे, रस्त्यांच्या डाव्या बाजूला जमा झालेली माती हटवावी.
शहराच्या दर्शनी भागात तसेच रस्त्यालगतच्या भिंतीवर ‘हेरिटेज वॉल पेंटिंग करावे. मकबरा परिसरातील स्वच्छतागृहाबाहेरील भिंतीवर पेंटिंग करावे आणि ऐतिहासिक वारसा व पर्यटनस्थळांच्या परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे सुरू राहतील याची दक्षता घ्यावी. याशिवाय सर्व किरकोळ डागडुजीची कामे, रस्त्यातील खड्डे बुजवण्याची कामे युद्धपातळीवर करावीत. या विविध कामांसाठीच्या खर्चाचे अंदाजपत्रक येत्या सात दिवसांत सादर करून मान्यता घ्यावी, असे आदेश प्रशासकांनी दिले.
शहरात चौकांचे सुशोभीकरण
शहरातील ऐतिहासिक दरवाजांवर स्मार्ट सिटीतर्फे अगोदरच रोषणाई केली आहे. ज्या दरवाजांवर रोषणाई नाही, तेथे रोषणाई करावी. वाहतूक बेट आणि चौकांचे सुशोभीकरण करावे. याशिवाय या रस्त्यांवर व्हर्टिकल गार्डन उभे करावेत.
हेही वाचा :- वडील शिंदे गटात तर मुलगा ठाकरे गटात ; वेळ आल्यास आमने सामने निवडणूक लढवतील?
दहा इलेक्ट्रिक बसचा ताफा
जी-२० परिषदेच्या निमित्ताने शहरात स्मार्ट सिटी बस विभागाला दहा इलेक्ट्रिक बसचा ताफा तयार ठेवण्याचे आदेश प्रशासकांनी दिले. या बसद्वारे शिष्टमंडळांना पर्यटनस्थळांवर नेण्यात येईल.
या बैठकीला अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, रवींद्र निकम, शहर अभियंता एस. डी. पानझडे, उपसंचालक नगररचना ए. बी. देशमुख, उपायुक्त अपर्णा थेटे, संतोष टेंगळे, नंदा गायकवाड, राहुल सूर्यवंशी, सोमनाथ जाधव, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांची उपस्थिती होती.