वडील शिंदे गटात तर मुलगा ठाकरे गटात ; वेळ आल्यास आमने सामने निवडणूक लढवतील?
आज पर्यंत राज्याच्या राजकारणात काका पुतणे निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढल्याचे आपण बघितले आहे. परंतु शिवसेनेत पडलेल्या दोन गटामुळे बाप लेक एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतेपदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करीत कीर्तिकर बाहेर पडले असले तरी त्यांचे पुत्र अमोल यांनी ठाकरेंसोबतच राहण्याचा निर्णय घेतला असून, मतदारसंघात सुरू झालेल्या बैठकांमुळे पिता-पुत्र सामना रंगणार, अशीच चिन्हे आहेत.
कीर्तिकर यांनी महाविकास आघाडीविषयी नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष करताना महाराष्ट्रातून पवारशाही संपलीच पाहिजे. राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचा सुरू असलेला राजकीय प्रवास घातक आहे, असे विधान केले. याविरोधी त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांनी मात्र आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे स्पष्ट केले.
युवासेनेचे सरचिटणीस असलेल् अमोल कीर्तिकर यांना नुकतेच शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेतेपद देण्यात आले. ते आमदारकीसाठीही इच्छुक आहेत. वडिलांनी पक्ष सोडताच अमोल यांनी मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरु केली त्यामुळे मतदारसंघात पिता-पुत्र असा सामना रंगणार आहे.