४५ हजार कोटींची गुंतवणूक; १२ हजार लोकांना रोजगार
ग्रीन हायड्रोजन ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रात उभा राहणार, अवदा ग्रुपबरोबर उपमुख्यमंत्र्यांची चर्चा
राज्यात मोठे प्रकल्प आणण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार युद्धपातळीवर काम करत असून याच अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अवदा ग्रुपच्या शिष्टमंडळाबरोबर राज्यात ग्रीन हायड्रोजन ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्याबाबत सकारात्मक चर्चा केली.
याबाबत अवदा ग्रुपचे विनीत मित्तल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चर्चेत राज्यात ४५ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारण्याबाबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली असून हा जागतिक स्तरावरील पहिला अनोखा प्रकल्प आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. यातून राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिजनचा एक भाग म्हणून भविष्यातील स्वच्छ ऊर्जा म्हणून ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाकडे बघितले जाते. या प्रकल्पातून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक होईल आणि सुमारे १२००० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील. आम्ही अवदा ग्रुपला सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.”असे उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस म्हणाले.