महाराष्ट्र

मुंबईतल्या गोडाऊनमधून १०० कोटींचे एमडी जप्त

Share Now

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबईत मोठी कारवाई केली आहे. तब्बल ५० किलो एमडी ड्रग्स एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी या कारवाई दरम्यान जप्त केले आहे. फोर्टमधल्या कबुतरखाना परिसरातल्या गोडाऊनमध्ये हे ड्रग्स सापडले आहेत.

एनसीबीने मोठी कारवाई केली असून ५० किलो एमडी ड्रग्स जप्त करत दोन आरोपींना अटक केली आहे. जप्त केलेल्या या ड्रग्सची किंमत सुमारे १०० कोटी इतकी आहे. अटक केलेल्या दोन आरोपींपैकी एक जण भारतातील सर्वात मोठ्या ड्रग्स तास्कारांपैकी एक असल्याची माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी मुंबईचे रहिवासी असून हे एक मोठं नेटवर्क आहे ज्यात आणखी काही लोकांना याआधीही अटक करण्यात आली होती.

दरम्यान, गुजरातमध्येही एनसीबीकडून एमडी ड्रग्स प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. एकूण ६० किलो एमडी जप्त करण्यात आली असून आंतरराष्ट्रीय बाजारात १२० कोटी इतकी आहे. गुजरातच्या जामनगर करण्यात आलेल्या कारवाईमध्ये चार जणांना अटक करण्यात आली. एअर इंडिया मध्ये पायलट असणाऱ्या सोहल नावाच्या व्यक्तीला या प्रकरणात अटक करण्यात आली होती.

प्राथमिक तपासात मुंबई आणि जामनगर परिसरात झालेली कारवाई ही एकाच प्रकरणाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. एका लॅबमध्ये हे ड्रग्स बनवलं जात होतं. लॅब चालवणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी याआधी अटक केलेली आहे. या गटाने २५० किलो एमडी ड्रग्स आतापर्यंत विकले असावे असा एनसीबीचा अंदाज आहे.

गुजरातमध्ये झालेल्या कारवाईनंतर मुंबईत तपास सुरू करण्यात आला होता. या कारवाईत एकाला गुजरातमधून अटक करण्यात आली होती. तीन जणांना मुंबईतून अटक केलेली होती. या प्रकरणात आतापर्यंत गुजरातमधून सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *