शिंदे गटाचे आमदार संजय सिरसाठ यांचे पॅनेल ग्रामपंचायत होणार बहुमताने विजयी, १४ पैकी ८ जागा जिंकल्या
वाळूज महानगर वडगाव-बजाजनगर या ग्रामपंचायतीसाठी निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणी सुरु आहे. या निवडणुकीत बंडखोर आ.संजय शिरसाट यांच्या पॅनेलची विजयी घोडदौड पाहायला मिळत आहे. आतापर्यंत घोषीत १४ पैकी ८ जागा आ. शिरसाट गटाने जिंकल्या असून. या निवडणुकीत एकूण १७ जागांसाठी ७२ उमेदवार आपले नशीब अजमावत आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडगाव-बजाजनगर ग्रामपंचायत निवडणुकीत सहा वाॅर्डांत लढत होत आहे. गेल्या वेळी शिवसेनेने १७ पैकी १६ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. भाजपचे अमित चोरडिया हे एकमेव उमेदवार विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीत आमदार संजय शिरसाट यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहे. शिवसेनेत फाटाफूट झाल्याने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले असून, या ग्रामपंचायतीची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. याचबरोबर मूळ शिवसेना व जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश गायकवाड यांचेही पॅनल निवडणुकीच्या रिंगणात असल्याने रंगत वाढली.
या ग्रामपंचायतीसाठी गुरुवारी ६० टक्के मतदान झाले होते. अंत्यत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीचे निकाल आता हाती येत असून यात आ. शिरसाट यांच्या गटाचे वर्चस्व दिसून येत आहे. सुरुवातीला जाहीर झालेल्या दोन वार्डातील ५ जागा आ.शिरसाट गटाला मिळाल्या आहेत. वार्ड क्रमांक १ मधून आ.शिरसाट गटाचे माजी उपसरपंच सुनील काळे, छाया प्रधान, पंचायत समितीचे सदस्य राजेश साळे यांच्या पत्नी सुनीता साळे हे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
तर वार्ड क्रमांक २ मधून आ.शिरसाट यांच्या पॅनलचे विष्णू उगले व माधुरी सोमासे यांनी विजय मिळविला आहे. या वार्डामधून विष्णु उगले यांनी माजी जि.प.सदस्य अनिल चोरडिया यांचे पुत्र व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमित चोरडिया यांचा दारुण पराभव केला आहे.
वार्ड क्रमांक ३ मधून आ.शिरसाट गटाच्या राणी पाटोळे, भाजपा पंचायत समिती सदस्य सतीश पाटील यांच्या पत्नी माया पाटील व मुळ शिवसेनेचे सागर शिंदे या तिघांनी बाजी मारली आहे.
वॉर्ड क्रमांक 4 मधून आ.संजय शिरसाट गटाच्या सुरेखा लगड, पूनम भोसले तर भाजप चे संभाजी चौधरी विजयी.
वॉर्ड क्रमांक 5 मधून मूळ शिवसेनेच्या कमल गरड, विजय सरकटे व मंदा भोकरे हे तीन उमेदवार विजयी.
मतमोजणी सुरुच असून आ. संजय शिरसाट यांच्या पॅनलची बहुमताकडे वाटचाल सुरु आहे.