१०-१२ वीचे विद्यार्थी आक्रमक, महाराष्ट्रात तब्बल ६ जिल्ह्यात आंदोलन
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीची लेखी परीक्षा ही ऑफलाईन होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता. ऑनलाईन परीक्षा आयोजित करणे शक्य नसल्याचे मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. मात्र, आता राज्यातील दहावी, बारावीचे विद्यार्थी या परीक्षांविरोधात आक्रमक झाले आहेत. मुंबईत धारावी, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूरमध्ये येथे विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.
दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात या मागणीसाठी हे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. धारावीत विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. शिक्षण ऑनलाईन झाले असताना परीक्षा ऑफलाईन का? असा सवाल विद्यार्थी विचारत आहेत. पालकांनी देखील ऑनलाईन परीक्षेची मागणी केली आहे.
याविषयी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या या मुद्द्यांवर चर्चा करता येईल असे सांगितले. आंदोलनाचा मार्ग नको, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. विद्यार्थ्यांनी सूचना त्यांच्या सूचना द्याव्यात यावर चर्चा करून मार्ग काढता येईल असेही त्या म्हणाल्या. संघटनांनी आमच्याशी संवाद साधायला हवा होता. विद्यार्थ्यांना असे थेट आंदोलनात आणायला नको होते, असे मत वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.