बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या घरी १ कोटी ४१ लाखाचे दागिने चोरीला
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या घरी लवकरच आनंदाची बातमी येणार आहे. सोनम कपूर गरोदर आहे. पण आता समोर आलेल्या बातम्या धक्कादायक आहेत. सोनम आणि आनंद आहुजासाठी ही बातमी वाईट आहे. वास्तविक, या जोडप्याच्या दिल्लीतील घरात चोरी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार , अभिनेत्रीच्या घरात चोरट्यांनी करोडो रुपयांवर हात साफ केला आहे.
सोनम आणि आनंद आहुजा यांच्या दिल्लीतील घरातून एक कोटी ४१ लाखांहून अधिक रुपयांची चोरी झाली आहे. आनंद आहुजाची आजी सरला आहुजा यांनी ही माहिती पोलिसांना दिली असून त्यांनी तक्रारही दाखल केली आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सोनम कपूरचे सासर दिल्लीतील अमृता शेरगिल मार्गावर आहे. जिथे आनंद आहुजाचे वडील हरीश आहुजा आणि आई प्रिया आहुजा आनंदची आजी सरला आहुजासोबत राहतात. घरात ३५ नोकर काम करतात आणि आता या सर्वांची पोलिस चौकशी करू शकतात, असे सांगण्यात येत आहे. दिल्ली पोलिस २५ कर्मचाऱ्यांची तसेच ९ केअर टेकर, ड्रायव्हर, गार्डनर्स आणि इतर कर्मचाऱ्यांची चौकशी करत आहेत.
सरला आहुजा (आजी) हिने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, ११ फेब्रुवारी रोजी तिने दागिने आणि रोख रक्कम तपासली तेव्हा चोरी झाल्याचे तिला समजले. २३ फेब्रुवारी रोजी तक्रार करण्यात आली होती. तिने पोलिसांना सांगितले की, तिने दोन वर्षांपूर्वी हे दागिने शेवटचे पाहिले होते. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस घरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.