संतोष देशमुख हत्याप्रकरणी न्याय मागण्याकरता आज मुंबईत जनआक्रोश मोर्चा
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील एका आरोपीचा शोध अद्यापही सुरू असून, अटक झालेल्या आरोपींची सखोल चौकशी झाली नसल्याने कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी मुंबईत “जनआक्रोश मोर्चा” काढला आहे. हा मोर्चा मुंबईतील मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानपर्यंत आयोजित करण्यात आला असून, यामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य आणि देशमुख कुटुंबीय सहभागी झाले आहेत.
आजच्या मोर्चात संतोष देशमुख यांच्या बहिणी प्रियांका चौधरी यांनीही सहभाग घेतला. टीव्ही ९ मराठीशी संवाद साधताना त्यांनी भावनिक शब्दांत संतोष देशमुख यांना लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी सरकारकडे केली.
प्रियांका चौधरींची भावनिक विनंती
प्रियांका चौधरी म्हणाल्या, “जर योग्य पद्धतीने तपास झाला असता, तर उर्वरित आरोपी पकडला गेला असता. आता दोन महिने झाले तरी आरोपी अद्यापही फरार आहे. त्यामुळे आम्हाला प्रश्न पडतोय की, पुढे कसं होणार? भाऊंच्या मुलांचं शिक्षण कसं होईल? वैभवीची परीक्षा जवळ आली आहे. कुटुंबाचा सांभाळ कसा होणार, हे समजत नाही. माझी धाकटी वहिनी सध्या रुग्णालयात आहे. लहान भाऊ सलाईन लावून मोर्चात सहभागी झाला आहे. तरीही सरकार दखल घेत नाही, हे दुर्दैवी आहे.”
त्यांनी पुढे सरकारला कळकळीची विनंती करत म्हटलं, “लवकरात लवकर आरोपीला अटक करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी. जर माझ्या लहान भावालाही काही झालं, तर कुटुंब कसं उभं राहील? माझे आई-वडील वृद्ध आहेत, आणि मी स्वतःही आजारी आहे. मात्र परिस्थितीमुळे चिमुकल्यांनाही मोर्चात उतरावं लागलं, म्हणून मी आज येथे आले आहे.”
संतोष देशमुख यांचे व्यक्तिमत्त्व
भावनांवर ताबा ठेवत त्यांनी आपल्या भावाच्या आठवणींना उजाळा दिला. “पाच महिन्यांपूर्वी भाऊ पुण्याला आला होता. आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. माझ्या तब्येतीबद्दल बोलताना त्याने मला रस्त्यावर राहणाऱ्या लोकांचं उदाहरण दिलं होतं, ते कसे आनंदाने राहतात, हे दाखवलं होतं. तो एक राजा आणि देवमाणूस होता. तो आम्हाला आनंदी कसं राहायचं हे शिकवत होता. त्याच्या शब्दांमुळेच मी अनेकदा खचलेली परिस्थिती सावरली. त्याच्या मुलांकडे पाहून माझं मन हेलावलं आहे. सरकारने तरी त्यांचं भविष्य लक्षात घेऊन न्याय द्यावा,” असं त्यांनी सांगितलं.
शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत भेट
मोर्चात सहभागी आंदोलकांचे शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. हत्याप्रकरणाच्या तपासाबाबत सद्यस्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी ही भेट होणार आहे. यासोबतच पुढील आंदोलनाची दिशा आणि निर्णयही या बैठकीत घेतले जातील.