लाडक्या बहिणी व सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का? अर्थसंकल्पाकडे लक्ष
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
याच मुहुर्तावर नेमक रोहित पवारांनी राज्य सरकारला आश्वासनांची आठवण करून दिली आहे.
महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर होणार – शेतकरी, महिला आणि सर्वसामान्यांसाठी कोणत्या घोषणा?
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या बहुमताने विजय मिळवून सत्ता स्थापन केलेल्या महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज विधिमंडळाच्या अधिवेशनात सादर होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार दुपारी २ वाजता राज्याचा हा महत्त्वपूर्ण अर्थसंकल्प विधानसभेत मांडणार आहेत. नव्या सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, गोरगरिब आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी कोणत्या योजना जाहीर होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्याची शक्यता असून “शेतकरी सन्मान योजना” अंतर्गत मदतीत वाढ केली जाणार असल्याचे सरकारने आधीच जाहीर केले आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानात ३,००० रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना थेट फायदा होईल.
लाडकी बहिण योजना – २,१०० रुपये मिळणार का?
महिला वर्गासाठी महत्त्वाची असलेली “लाडकी बहिण योजना” यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रस्थानी असण्याची शक्यता आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना दरमहा १,५०० रुपयांऐवजी २,१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन पाळले जाते का, याकडे लाखो महिलांचे लक्ष लागले आहे. राज्यभरातील महिलांमध्ये या निर्णयाबाबत मोठी उत्सुकता आहे, कारण त्याचा थेट परिणाम त्यांच्यावर होणार आहे.
सर्वसामान्यांसाठी कोणते निर्णय अपेक्षित?
या अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील विकास प्रकल्प, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, वीज बिल सवलती, आणि सौरऊर्जेचा वापर करणाऱ्यांसाठी प्रोत्साहनपर योजना जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने याआधी ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांसाठी विविध योजनांची घोषणा केली होती.
महायुती सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला, त्यामुळे राज्यातील जनतेच्या अपेक्षा मोठ्या आहेत. शेतकरी कर्जमाफी, महिलांसाठी आर्थिक मदत, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी प्रोत्साहन योजना, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रासाठी विशेष निधी, अशा अनेक विषयांवर अर्थसंकल्पात ठोस निर्णय घेण्यात येतील, अशी जनतेची अपेक्षा आहे.
अर्थसंकल्प घोषणांवर संपूर्ण राज्याचे लक्ष
या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महायुती सरकार आपली आर्थिक धोरणे आणि राज्याच्या विकासाची दिशा स्पष्ट करेल. त्यामुळे राज्यभरातील नागरिक, उद्योगपती, शेतकरी, नोकरदार आणि महिला वर्ग या अर्थसंकल्पावर डोळा ठेवून आहेत. अजित पवार यांची अर्थसंकल्पीय भाषणात कोणत्या नव्या योजना जाहीर होतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
रोहित पवार यांनी tweet करत सरकारला थेट प्रश्न केले आहेत.
आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना महायुतीने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन देणं क्रमप्राप्त आहे.
या आश्वासनांचं प्रतिबिंब अर्थसंकल्पात दिसेल, अशी अपेक्षा आहे.
•लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रु.
•महिला सुरक्षेसाठी 25 हजार महिलांची पोलीस भरती.
•शेतकरी कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेद्वारे वर्षाला 15 हजार रु.
•MSP वर 20 टक्के अनुदान.
•वृद्धांना महिन्याला 1500 रुपये वरून 2500 रुपये.
•अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15 हजार रु. मानधन आणि विमा संरक्षण.
•१० लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपये विद्यावेतन आणि 25 लाख रोजगार निर्मिती.