रेंट-द-चिकन ही प्रक्रिया काय आहे ? लोकप्रिय सेवा…
अमेरिकेत अंड्यांच्या किमतीत वाढ, ‘रेंट-द-चिकन’ सेवा लोकप्रिय
अमेरिकेत अंड्यांच्या किमती गगनाला भिडल्या असून, घाऊक बाजारात प्रति डझन अंडी सात ते आठ डॉलर्स (सुमारे ६०० ते ६५० रुपये) दराने विकली जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक बोजा पडला आहे. यावर उपाय म्हणून अमेरिकेत ‘रेंट-द-चिकन’ ही नवी संकल्पना उदयास आली आहे, ज्यामुळे नागरिकांना घरबसल्या अंडी उत्पादनाची संधी मिळत आहे.
काय आहे ‘रेंट-द-चिकन’?
‘रेंट-द-चिकन’ म्हणजेच अंडी देणाऱ्या कोंबड्या भाड्याने देण्याची एक अभिनव सेवा आहे. या उपक्रमांतर्गत न्यू हॅम्पशायरसह अनेक कंपन्या नागरिकांना दोन ते चार कोंबड्या भाड्याने देतात. या सेवेत कोंबड्यांसाठी आवश्यक खाद्य आणि संगोपन मार्गदर्शक सूचना पुरवल्या जातात. या सुविधेमुळे ग्राहकांना घरच्या घरी ताजी अंडी मिळतात.
आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पर्याय
न्यू हॅम्पशायरच्या ‘रेंट-द-चिकन’ कंपनीचे मालक ब्रायन टेम्पलटन यांच्या मते, एक कोंबडी आठवड्यात एक डझन अंडी देते. दोन कोंबड्या भाड्याने घेतल्यास आठवड्याला दोन डझन अंडी मिळतात. सहा महिन्यांसाठी दोन कोंबड्यांचे भाडे सुमारे ६०० डॉलर्स (सुमारे ५२,००० रुपये) आहे. तुलनेत, बाजारातून अंडी विकत घेतल्यास महिन्याला ३०० डॉलर्सचा (सुमारे २६,००० रुपये) खर्च येऊ शकतो. त्यामुळे ही सेवा ग्राहकांसाठी अधिक किफायतशीर ठरत आहे. काही ग्राहकांना कोंबड्या पाळण्याचा अनुभव आवडल्यास, ते भाड्याच्या कालावधीच्या शेवटी त्या खरेदी करू शकतात.
अंड्यांच्या दरवाढीचे कारण
अमेरिकेत अंड्यांचे दर वाढण्यामागे मुख्यतः पॅथोजेनिक एव्हियन इन्फ्लुएंझा (HPAI) आणि बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव कारणीभूत आहे. २०२२ पासून लाखो कोंबड्या या विषाणूमुळे मृत्युमुखी पडल्या, ज्यामुळे अंडी उत्पादनावर मोठा परिणाम झाला. २०२४ मध्येही हा संसर्ग वेगाने पसरत असून, लाखो कोंबड्या माराव्या लागल्या आहेत. परिणामी अंडी उत्पादनात मोठी घट झाली आहे.
भविष्यातील परिस्थिती
अमेरिकेत २०२५ मध्येही अंडी उत्पादनावर बर्ड फ्लूचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता USDA ने व्यक्त केली आहे. वाढत्या किमतीमुळे काही सुपरमार्केट्सनी अंडी विक्रीवर मर्यादा आणल्या आहेत, तर काही ठिकाणी अंडी चोरीच्या घटनाही घडल्या आहेत. परिस्थिती कधी सुधारेल हे निश्चित नाही, मात्र, ‘रेंट-द-चिकन’ सारख्या सेवांमुळे नागरिकांना अधिक स्वस्त दरात अंडी मिळण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.