युझवेंद्र चहल-धनश्रीच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब ?
युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट अधिकृत, वांद्रे न्यायालयाचा अंतिम निर्णय.
भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या विभक्त होण्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होत्या. अखेर त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. २० मार्च २०२५ रोजी मुंबईतील वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटावर अंतिम मंजुरी दिली असून, आता दोघेही अधिकृतपणे विभक्त झाले आहेत.
४ वर्षांच्या सहजीवनानंतर वेगळे मार्ग
चहल आणि धनश्री यांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. गुरुवारी, २० मार्च रोजी न्यायालयाने त्यांच्या अर्जावर सुनावणी घेतली आणि घटस्फोट मंजूर केला. यामुळे चार वर्षे आणि तीन महिने एकत्र राहिल्यानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
कोर्टात दोघांची उपस्थिती
या सुनावणीसाठी चहल आणि धनश्री दोघेही न्यायालयात हजर होते. चहलने काळ्या रंगाचे जॅकेट आणि मास्क घालून हजर होता, तर धनश्री पांढऱ्या टी-शर्टमध्ये दिसली. दोघांचेही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चहलचे वकिल नितीन गुप्ता यांनी या घटनेची पुष्टी करताना सांगितले की, “दोघांचेही लग्न अधिकृतरित्या संपुष्टात आले असून, ते आता पती-पत्नी नाहीत. त्यांची संयुक्त याचिका न्यायालयाने मंजूर केली आहे.”
संबंधांतील तणाव आणि घटस्फोटाची प्रक्रिया
चहल आणि धनश्रीने २४ डिसेंबर २०२० रोजी लग्न केले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा होत्या. त्यांनी एकमेकांना सोशल मीडियावरून अनफॉलो केले, तसेच एकमेकांचे फोटोही हटवले. अखेर गेल्या महिन्यात त्यांनी घटस्फोटासाठी अधिकृत प्रक्रिया सुरू केली आणि आज न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले.
या निर्णयानंतर दोघांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता कायम आहे.