महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार आज सादर करणार अर्थसंकल्प !
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आज सादर होणार, अजित पवार ११व्या वेळेस सादर करणार बजेट
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दुपारी २ वाजता विधानसभेत हा महत्त्वाचा दस्तऐवज मांडला जाणार आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांची किती पूर्तता होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
अर्थसंकल्प सादर करण्याच्या क्रमवारीत अजित पवार आता दुसऱ्या स्थानावर पोहोचले असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मागे टाकले आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात एकूण ७८ अर्थसंकल्प सादर झाले आहेत. त्यापैकी दिवंगत माजी अर्थमंत्री बॅ. शेषराव वानखेडे यांनी सर्वाधिक १३ वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. आता अजित पवार ११व्यांदा अर्थसंकल्प सादर करत असून, जयंत पाटील यांनी १० आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी ९ वेळा बजेट सादर केले आहे.
आजच्या अर्थसंकल्पात राज्य सरकार ‘लाडकी बहिण योजना’संदर्भात मोठी घोषणा करणार का, याकडे विशेष लक्ष आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना मिळणाऱ्या १५०० रुपयांच्या निधीत वाढ करून तो २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे अजित पवार यासंदर्भात काही मोठा निर्णय जाहीर करणार का, याची उत्सुकता आहे. याशिवाय, ग्रामीण भागातील रस्ते काँक्रीटीकरण, सौरऊर्जेचा वापर करणाऱ्यांसाठी सवलती, आणि अन्य महत्त्वाच्या घोषणा देखील अपेक्षित आहेत.
राज्याच्या अर्थकारणाला दिशा देणाऱ्या या अर्थसंकल्पातील घोषणांमुळे नागरिक, उद्योजक, शेतकरी आणि महिला यांच्यासाठी कोणते निर्णय महत्त्वाचे ठरतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
अर्थमंत्री म्हणून सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे नेते:
- बॅ. शेषराव वानखेडे – १३ वेळा (सर्वाधिक)
- अजित पवार – १० वेळा (आज ११वा अर्थसंकल्प सादर करणार)
- जयंत पाटील – १० वेळा
- सुशीलकुमार शिंदे – ९ वेळा
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा केवळ आर्थिक दस्तऐवज नसून, राज्याच्या विकासाची दिशा ठरवणारा एक महत्त्वाचा आराखडा असतो. प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकरी, उद्योजक, नोकरदार, आणि महिला वर्गासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात.