काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्रास दिला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप
पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका: “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत काँग्रेसने कायम नाराजी व्यक्त केली”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर भाष्य करताना काँग्रेसवर जोरदार टीका केली. त्यांनी काँग्रेसवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबाबत नाराजी बाळगल्याचा आरोप केला. मोदी म्हणाले की, काँग्रेसने आंबेडकर यांच्या प्रत्येक निर्णयाला विरोध केला आणि दोन निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव करण्यासाठी विविध प्रयत्न केले. इतकेच नव्हे, तर काँग्रेसने त्यांना ‘भारत रत्न’ देण्याचीही गरज वाटली नाही. या सर्व गोष्टींचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“जय भीम” म्हणताना काँग्रेसला अडचण का?
मोदींनी यावेळी काँग्रेसवर आणखी एक टीका करत म्हटले की, समाजाच्या सर्व घटकांनी आंबेडकर यांचा सन्मान केला, मात्र काँग्रेसला नाईलाजाने “जय भीम” म्हणावे लागत आहे. पण ते म्हणताना त्यांचे तोंड कोरडे पडते, असे त्यांनी टोमणा मारला. काँग्रेस आपल्या भूमिका वेळोवेळी बदलण्यात पटाईत असल्याचेही त्यांनी सांगितले.
“दुसऱ्यांची रेषा छोटी करण्यापेक्षा स्वतःची मोठी करा”
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, “सबका साथ, सबका विकास” ही घोषणा आम्ही दिली, तर काँग्रेसने नेहमीच दुसऱ्यांची रेषा छोटी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनेक सरकारे अस्थिर केली आणि त्यामुळेच लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेससोबत असलेले पक्ष त्यांच्यापासून दूर जात आहेत. काँग्रेसच्या अशा धोरणांमुळेच आज पक्षाची दयनीय स्थिती झाली आहे.
यावेळी मोदींनी काँग्रेसला सल्ला देत म्हटले की, दुसऱ्यांना कमी करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी स्वतःच्या कार्यक्षमतेवर भर द्या. तसे केल्यास जनता पुन्हा तुमचा विचार करेल.