historyमहाराष्ट्र

धोरणं धाब्यावर किल्ले वाऱ्यावर ! देवगिरी किल्याची न भरून येणारी हानी

Share Now

आपली पुण्यभूमी महाराष्ट्र! आपण इतिहासाच्या नावे अभिमानाने छाती फुगवणारे, वारसाला जपणारे, गडकिल्ल्यांच्या साक्षीने संस्कृतीचे सोनं घडवणारे वगैरे महाराष्ट्रीयन मंडळी. पण ही मंडळी अन या महाराष्ट्राची अस्मिता आज खरचं कितपत आपल्या अंगी उरली आहे, हे तपासणं गरजेचं होऊन जातं. आपण फार चांगल पाहतो, चांगल नेमकं हल्ली काय पाहिलं? तर… तर त्या इतिहासाची राख होताना आपण शांतपणे पाहत बसलो, इतकचं केलं. नुकत्याच लागलेल्या आगीनं देवगिरी किल्ल्याचं काळीज करपून गेलं. आणि आपल्या काळजात साधं चर्रदेखील झालं नाही. देवगिरीचं काळीज वणव्याच्या विळख्यात होतं, मोर, ससे, वानरं, खारूताई अन सरपटणारे प्राणी या वणव्यात व्याकुळतेनं मृत्युच्या तोंडघशी पडू लागले होते… त्यांना कदाचित दोन क्षण देवगिरीच्या निर्जीव का असेना पण काळजाची किव आली असेलं… मात्र आपल्याला अजूनही त्या होरपळून मेहेल्या प्राणीमांत्राविषयी मायेचा पाझर फुटला नसेलं… तिथे लागलेल्या आगीत अन त्या धुराच्या आड जणू सरकारी यंत्रणांची जबाबदारीही धूसर झाली; असं म्हणावं लागेलं.

देवगिरी म्हणजे आपला इतिहास, आपली जबाबदारी, आपली अस्मिता. हा किल्ला केवळ दगडांचा ढिगारा नव्हता ना तो शौर्य, बुद्धिमत्ता आणि स्थापत्यकलेचा जिवंत दस्ताऐवज आहे. पण या किल्ल्यावर आग लागली आणि ती विझवताना निष्क्रिय व्यवस्थेच्या निर्दयी मुखवटेही गळून पडलेत.

फोटो साभार:- संकेत कुलकर्णी. ( फेसबुक.)

एकीकडे या महाराष्ट्रासाठी जिथे सरकार पर्यटन विकास म्हणून कोट्यवधींचे प्रस्ताव सादर करतं, तिथे आग विझवण्यासाठीही साधी यंत्रणा वेळेवर पोहचतं नाही, हे कुठलं धोरण? बरं यंत्रणा वेळेवर पोहचत नाही हे बाजू ला राहू द्या… वणवा विझवण्यासाठी गडावर सुविधाच नाही; हे अधिक भयंकर चित्र आहे. दरवर्षी जर उन्हाळा सुरू झाल्यावर अशी आग लागते, हे ठाऊक असूनही इथले स्थानिक नेते, शासन, प्रशासन, किल्ला व्यवस्थापन कार्यप्रणाली काहीच उपाययोजना करू शकत नसेलं तर कसला आलायं या मराठी मातीचा अभिमान?

आज हे सर्व पाहून मुद्दाम प्रश्न करावासा वाटतो ते म्हणजे ऐतिहासिक वारसासाठी heritage conservation हे केवळ फाईलमधलं एक परकीय नाव राहिलंय का? आणि तसंच असेलं तर मग इतिहास हा फक्त उपभोगाची वस्तू म्हणून वापरायचा का? देवगिरीच्या टिकीटांपासून जो कर शासनदरबारी गोळा होतो, अर्थात वर्षभरातील साधारणं कितीतरी कोटी रूपये धरून चाला. त्या पैशांचा हिशोब कुठे आहे? जर तुमच्याकडे आग विझवणारी यंत्रणा वेळेवर ठिकाणी नाही तर मग सामान्य नागरिक अर्थात पर्यटक जे येतात त्यांच्या टिकीटांचे पैसै नेमके कोणाच्या घश्यात घालणं सुरू आहे, याचीही एक चौकशी पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे.

ही अलीकडे लागलेली आग नुसती झाडाझुडपांची नव्हती. ती होती आपल्या बेपर्वाईची, आपल्यातल्या व्यवस्थेच्या गोंधळाची आणि आपल्याच अस्मितेच्या ऱ्हासाची.

किल्ल्याची निगा राखण्याची जबाबदारी केवळ पुरातत्व विभागाची नाही हे मान्य. ती सर्वांची आहे शासनाची, स्थानिक प्रशासनाची आणि आपलीसुद्धा. पण इथे इतक्या महत्वाच्या प्रसंगात नक्कीच प्रशासन बेजबाबदार राहिलं आहे, असं म्हणावं लागेलं. लोक केवळं आज फोटो काढून इतिहासाच्या आठवणींना तात्पुरता उजाळा जातात. लोकांमधे धमक नाही, प्रशासनाला जाब विचारण्याची… अन प्रशासन बांधिल नाही कोणत्या नियमासाठी…!! थोडक्यात काय तर आपल्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी फक्त फायलींवर रेघोट्या ओढल्या गेलेली धोरणे आस्तित्वात आहेत पण ठोस पाऊले मात्र कुणीच उचललेली दिसत नाहीत.

प्रश्न एवढाचं कि किल्ला पेटतो तेव्हा आपण फक्त राख गोळा करतो का? तर नाही किल्ला पेटल्यानंतर राख गोळा होते ती संस्कृतीची, किल्ल्याने अभेद्यपणे जपलेल्या बुरूजांची, माणसांच्या शौर्यांची, निष्पाप प्राण्यांच्या अवशेषांची. आपल्याला लाभलेला गौरवशाली इतिहास भस्म होऊन “राखेतचं जाऊ द्यायचा कि तो अभेद्यपणेचं पुन्हा राखून ठेवायचा” याची समज येणं अधिक गरजेचं आहे.

–©️किरण बंडू पवार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *