आरोपांनंतर धनंजय मुंडे आक्रमक सर्व आरोप फेटाळून लावत दिला इशारा
धनंजय मुंडे आणि अंजली दमानिया यांच्यातील संघर्ष तीव्र; अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या धनंजय मुंडे आणि अंजली दमानिया यांच्यातील संघर्ष चांगलाच गाजत आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याचा धनंजय मुंडे यांच्याशी संबंध असल्याचा आरोप करत, अंजली दमानिया यांनी त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी काही धक्कादायक खुलासेही केले असून, काल (४ फेब्रुवारी) त्यांनी पत्रकार परिषद घेत कृषी विभागातील कथित भ्रष्टाचाराचे पुरावे माध्यमांसमोर सादर केले.
यावर आता धनंजय मुंडे यांनीही प्रत्युत्तर दिले असून, अंजली दमानिया यांनी खोटे आरोप करून बदनामी केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दमानिया यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
अंजली दमानिया यांनी कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा दावा केला आहे. कृषी विभागाच्या योजनांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत, लाभ हस्तांतर योजनेतील (DBT) कथित घोटाळ्यावरही त्यांनी प्रकाश टाकला. सरकारी निधी चुकीच्या पद्धतीने वापरला जात असल्याचे पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
धनंजय मुंडे यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले असून, त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात सर्व व्यवहार नियमानुसार आणि मुख्यमंत्री यांच्या मान्यतेनंतरच पार पाडल्याचे स्पष्ट केले. “गेल्या ५८ दिवसांपासून माझ्यावर मीडिया ट्रायल सुरू आहे. यामागे कोण आहे, हे मला माहिती नाही. परंतु, अंजली दमानिया यांनी केलेले आरोप निराधार असून, लवकरच मी त्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अब्रूनुकसानीचा खटला दाखल करणार आहे,” असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
या संघर्षामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, पुढील घटनाक्रम काय वळण घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.